कुडाळ : गेल्या तीन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या चिपी विमानतळावरून नियमित विमान वाहतूक सेवा केव्हा सुरू होईल ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण गेले अनेक महिने या विमानतळावरून विमानसेवा नियमित सुरू नाही आहे.
२६ ऑक्टोबर २०२४ रोजी म्हणजे तीन महिन्यांपूर्वी येथे विमानसेवा देणाऱ्या अलायन्स एअरचा तीन वर्षांसाठीचा ठेका संपला. त्यानंतर मुंबईकडे जाणारी विमानसेवा बंद करण्यात आली असून त्याचा फटका प्रवाशांना आणि चाकरमान्यांना बसत आहे.
सिंधुदुर्ग देशातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून जाहीर झाल्यानंतर येथील प्रसिद्ध पर्यटनस्थळे पाहण्यासाठी दरवर्षी मोठ्या संख्येने देश-विदेशातील पर्यटक मोठ्या संख्येने भेट देतात. रेल्वे सेवेबरोबरच या जिल्ह्यात ठिकाणी वेंगुर्ला तालुक्यातील परुळे चिपी येथे विमानतळ करण्याचे निश्चित झाले. अनेक वर्षे या विमानतळाचे काम सुरू होते. काही वर्षांनी का होईना पण या विमानतळाचे उद्घाटन तीन वर्षांपूर्वी झाले. अलायन्स एअरची सिंधुदुर्ग ते मुंबई अशी विमानसेवा सुरू झाली.
नियमित प्रवाशांसह, पर्यटकांचाही प्रतिसाद
दि. ९ ऑक्टोबर २०२१ पासून चिपी विमानतळ, सिंधुदुर्ग आणि मुंबईदरम्यान अलायन्स एअरची उड्डाणे सुरू झाली. याचा पर्यटकांना तसेच स्थानिक आणि व्यावसायिक दोघांनाही पर्यटकांना तसेच स्थानिक आणि व्यावसायिक दोघांनाही मोठा फायदा झाला.
या तीन वर्षांत पर्यटनाला चालना देणाऱ्या आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला हातभार लावणाऱ्या या हवाई सेवेला देश-विदेशातील नियमित स्थानिक प्रवासी आणि पर्यटकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे.
पंतप्रधान यांच्या ड्रीम प्रोजेक्टमध्ये समावेश
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ड्रीम प्रोजेक्टमधील उड्डाण योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग चिपी विमानतळाचा समावेश करण्यात आला होता. त्यामुळे सिंधुदुर्गातील सर्वसामान्य लोकांना परवडणाऱ्या दरात विमान प्रवास सोपा झाला होता.
पर्यटनावर दूरगामी परिणाम
अलायन्स एअर या विमान कंपनीने त्यांचा करार संपल्याने दि. २६ ऑक्टोबर २०२४ पासून आपली उड्डाणे बंद करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन्ही कोकण जिल्ह्यांतील पर्यटन व्यवसायावर याचा विपरीत परिणाम आणि दूरगामी परिणाम निश्चित झाला.
प्रवासी वाढू शकतात
या ठिकाणी अविरत विमानसेवा सुरू केल्यास निश्चितच या विमानतळावरून प्रवाशी मोठ्या प्रमाणावर वाढू शकतात. त्यातच पर्यटनाच्या हंगामात, गणेशोत्सव, होळी सण आणि इतर सण, उत्सवाच्या दिवसात मोठ्या प्रमाणावर चाकरमानी याठिकाणी या विमानातून मुंबईकडे जात येत होते.
तीन वर्षांचा करार संपला
अलायन्स एअर या कंपनीमार्फत चिपी ते मुंबई आणि मुंबई ते चिपी या मार्गावर विमान सेवा सुरू करण्यात आली होती. ही सेवा तीन वर्षांच्या करार पद्धतीने सुरू करण्यात आली होती. आता ही मुदत २६ ऑक्टोबर २०२४ रोजी संपली आहे.
अलाईन्स एअरची चिपी मुंबई विमानसेवा बंद होऊन काही महिने झाले. त्या पाठोपाठ फ्लाय ९१ च्या हैदराबाद व बेंगलोर सेवाही बंद झाल्या. अलीकडेच सुरू झालेली पुणे ते चिपी ही आठवड्यातून अनियमित व वारंवार खंडित होती.
या विमानतळावरून पुन्हा विमानसेवा नियमित सुरू करण्यात यावी अशी मागणी होत असून राज्यात महायुती व केंद्रात भाजपची सत्ता आहे. त्यामुळे हे विमानतळ सुरू करण्यासाठी येथील आमदार, मंत्री, खासदार यांनी विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे.