रत्नागिरी:-‘अपार आयडी’ उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीतील सर्व नोंदी डिजिटल लॉकरमध्ये संग्रहित राहणार आहेत. त्यामुळे भविष्यात शैक्षणिक रेकॉर्ड ऑनलाइन स्वरुपात सहज उपलब्ध होणार आहे. तसेच विद्यार्थ्यांचा ओळख क्रमांक एकसंध राहणार आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 2 लाख 7 हजार 166 विद्यार्थ्यांपैकी 1 लाख 88 हजार 501 विद्यार्थ्यांचे अपार आयडी तयार केले आहेत. जिल्ह्याचे काम 90.99 टक्के काम पूर्ण झाले आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत पहिली ते बारावीतील प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी ऑटोमेटेड परमनेंट अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री (अपार आयडी) तयार केली जात आहे. शिक्षण विभागाने शंभर टक्के विद्यार्थ्यांचे अपार आयडी लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अपार आयडी प्रक्रियेसाठी पालकांची संमती आवश्यक असल्याने आणि तांत्रिक अडचणींमुळे काही प्रमाणात विलंब होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद शिक्षण विभागाने शाळांच्या अडचणी जाणून घेत त्यावर उपाययोजना करण्यासाठी विशेष मार्गदर्शन केले.
अपार आयडी काढणे विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे आहे. सर्व शाळांनी हे काम त्वरित पूर्ण करावे. काही अडचण असल्यास शिक्षण विभागात संपर्क साधून समस्या सोडवून घेण्याच्या सूचना देण्यात आल्याचे जिल्हा शिक्षण विभागामार्फत सांगण्यात आले आहे.