दापोली:- रानकोंबडयाची शिकार केल्याप्रकरणी दापोली तालुक्यातील नितीन शांताराम झाडेकर (34, कुंभवे) व आशिष अशोक पेडमकर (32, वाकवली) या दोघांना विनविभागाने ताब्यात घेतले. हे दोघेजण जखमी अवस्थेत असलेल्या रानकोंबडा व छऱ्यासह बंदुकीसह आढळून आले. हा प्रकार दापोली तालुक्यातील कुंभवे येथे सोमवारी उघडकीस आला.
तालुक्यातील मौजे कुंभवे येथील शिवप्रसाद चंद्रकांत शिंदे (कुंभवे) यांनी त्यांच्या घराच्या मागील बाजूस रान कोंबडयाची शिकार झाल्याबाबत वनाधिकाऱ्याना 17 फेब्रुवारी रोजी कळवले. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने वन अधिकारी यांनी जागेवर जावून वस्तूस्थितीची पाहणी केली असता, शिंदे यांच्या राहत्या घराच्या मागील बाजूस 100 मीटर अंतरावर असणाऱ्यारुपेश भिकू झाडेकर यांच्या घराकडे दोन इसम रान कोंबडा शिकार करून घेवून गेले असल्याचे तक्रारदार शिवप्रसाद शिंदे यांनी समक्ष दाखवले.
त्यानुसार रुपेश भिकू झाडेकर यांच्या पडवीमध्ये जावून पाहणी केली असता त्या ठिकाणी नितीन शांताराम झाडेकर व आशिष अशोक पेडमकर हे जखमी अवस्थेतील रानकोंबडा व छऱ्याच्या बंदुकीसह आढळून आले. त्या दोघांना ताब्यात घेवून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई विभागीय वनाधिकारी गिरीजा देसाई, प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली दापोलीचे वनपरीक्षेत्र अधिकारी प्रकाश ग. पाटील, वनपाल रामदास खोत, शुभांगी भिलारे, सुरज जगताप, वि. द. झाडे, शुभांगी गुरव यांनी पार पाडली.