फणसाच्या 86 प्रकारच्या झाडातून घेतात उत्पन्न
रत्नागिरी : जिद्द आणि चिकाटी अंगी असेल तर अशक्य अस काहीच नाही. त्याला वयाची मर्यादाही लागत नाही. असेच रत्नागिरीच्या झापडे गावातील 64 वर्षीय हरिश्चंद्र देसाई तरुणांना लाजवेल अशी फणस शेतीतून कमाई केली आहे. त्यांनी फणस शेतीला एक नवी ओळख दिली आहे. कोकणातील सुप्रसिद्ध हापूस आंब्याच्या मातीत, देसाई यांनी फणसाची 86 प्रकारची झाडं देशभरातून तसेच थायलंड, श्रीलंका, मलेशिया आणि व्हिएतनामसारख्या देशांमधून गोळा केली आहेत. यातून ते वर्षाला 92 लाखांचे उत्पन्न घेतात.
पूर्वी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात नोकरी करणाऱ्या देसाई यांची 13 एकर जमीन फणस शेतीसाठी समर्पित आहे. त्यांच्याकडे 1250 फणसाची झाडं असून ती वर्षभर फळं देतात. विशेष म्हणजे, त्यांनी ‘देसाई कप्पा’ नावाचा फणसाचा प्रकार विकसित केला आहे, जो गोडसर चव आणि केरळमध्ये लोकप्रियतेमुळे विशेष ओळखला जातो.
देसाई यांचे फणसाचे झाड प्रौढ झाल्यावर वर्षाला 200 फळं देऊ शकते, तर जुनी झाडं 500 फळं देतात. त्यांच्या या मिशनमध्ये त्यांचा मुलगा मिथिलेश देखील खांद्याला खांदा लावून मदत करतो. देसाई यांनी “जॅकफ्रूट किंग अॅग्रो प्रोड्युसर कंपनी” नावाची कंपनी स्थापन केली आहे. या कंपनीअंतर्गत 900 शेतकरी एकत्र येऊन फणसाची शेती करतात. तसेच देसाई हे विविध प्रॉडक्ट सुद्धा बनवतात. यात फणसाचे चिप्स, व्हेगन मिट, प्रिमिक्स, आणि सूप यांचा समावेश आहे. यातून ते वर्षाला 92 लाखांची उलाढाल करतात.
त्यांच्या या यशस्वी प्रवासामुळे ते ‘फणसाचा राजा’ म्हणून ओळखले जातात. हरिश्चंद्र देसाई यांचे कार्य कोकणातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायक ठरले आहे.