अमित यादव यांच्या अचानक बदलीने तालुक्यात हलचल
संगमेश्वर : संगमेश्वर पोलीस ठाण्याला गेली 2 वर्षे तात्पुरते पोलीस निरीक्षक लाभत आहेत. केवळ 2 वर्षात चक्क 5 पोलीस निरीक्षकाच्या बदल्या करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. तत्कालीन पोलीस निरीक्षक उदय झावरे यांची बदली झाल्यानंतर पुढच्या 2 वर्षात पाच पोलीस निरीक्षक या पोलीस ठाण्याला लाभले. यामध्ये प्रवीण देशमुख, स्मिता यादव, सुरेश गावित, नीळकंठ बगळे आणि नुकतेच बदली झालेले अमित यादव यांचा समावेश आहे. हे अधिकारी केवळ 5- 6 महिन्यांच्या कालावधीसाठी या पदावर कार्यरत होते. त्यांचा बदलीचा कालावधी हा अत्यल्प राहिला आहे.
एखाद्या पोलीस निरीक्षकाची माहिती जनतेपर्यंत पोहोचते न पोहोचते तोपर्यंत दुसरा अधिकारी या पदावर विराजमान होतो. गेल्या 2 वर्षात वारंवार अधिकारी बदलण्यात आल्याने नेमके चाललेय तरी काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. नुकतेच संगमेश्वर पोलीस ठाण्याचा सहा महिन्यांपूर्वी पदभार स्वीकारलेले पोलीस निरीक्षक अमित यादव याचीही अल्पावधितच बदली झाली आहे. त्यांनी २४ ऑगस्ट २०२४ रोजी संगमेश्वर पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला होता.
अमित यादव यांनी गावांमधील नागरिकांना विश्वासात घेत अनेक हितकारक मोहिमा हाती घेतल्या होत्या. त्यांच्या कामाच्या कार्यपद्धतीमुळे कारकिर्दीचा आलेख उंचावत असतानाच त्यांच्या बदलीची बातमी समोर आली आणि नागरिकांमध्ये नाराजीचा सुर उमटू लागला आहे. यादव यांनी अनेक अवैध धंद्यांना आळा घातला होता. गांजा विक्री करणारे आणि नशा करणाऱ्या तरुणांना पकडुन त्यांचे समुपदेशनही केले होते. अनेकांना नशापासून दूर राहण्याचा सल्ला त्यांनी दिला होता. अपघात, खून, मारामारी अशा घटना घडल्या की ते स्वतः घटनास्थळी जाऊन पाहणी करत असत. त्या घटनेची प्रत्येक अपडेट ते आपल्याकडे ठेवत असत. मुंबई गोवा महामार्गावरील अपघातस्थळी ते व त्यांचे सहकारी त्वरित पोहोचून अनेकांना त्यांनी मदतीचा हात दिला आहे. पोलीस आणि नागरीक यांच्यात सौहार्दपूर्ण वातावरण तयार करण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता.
अमित यादव यांचे सर्वसामान्यांपासून ते अगदी लोकप्रतिनिधींपर्यंत चांगले संबंध होते. एक अधिकारी आपल्याशी अदबीने आणि आदराने वागत असल्याने अनेकांच्या गळ्यातील ताईत बनले होते. लोकांची आत्मीयता वाढली होती. सर्वांशी आपुलकीच्या नात्याने आणि पत्रकारांशीही तेवढ्याच आत्मीयतेने वागणारे असे अधिकारी संगमेश्वर तालुक्याला लाभल्याने सारे आनंदीत होते. पोलीस कर्मचाऱ्यांशी ही त्यांचे अगदी मित्रत्वाचे संबंध होते. त्यांनी कधीही आपल्या अधिकाराचा, पदाचा बडेजाव केला नाही. त्यांची सर्वाप्रती असलेली वागणूक भावणारी होती. असे असताना संगमेश्वर पोलीस ठाण्याला चांगला अधिकारी मिळाला. असे वाटत असतानाच त्यांची बदली करण्यात आली. अस काय घडलं की ज्यामुळे या चांगल्या अधिकाऱ्याची अल्पावधीत बदली करावी लागली. मात्र त्यांच्या या बदलीने अनेकांच्या डोळ्यात पाणी आले आहे.