चिपळूण (प्रतिनिधी):– मा. विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था, कोकण विभाग व कोकण विभाग नागरी सहकारी पतसंस्था संघ मर्या. अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेला ‘कोकण पतसंस्था भूषण २०२५’ पुरस्कार नुकताच मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार चिपळूण नागरी चे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण, व्हाईस चेअरमन अशोक साबळे, संचालिका सौ. स्मिताताई चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्वप्ना यादव, यांच्यासह संचालक मंडळाने स्विकारला.
चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेची संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी वाटचाल सुरू आहे. आर्थिक व्यवसायिकता सांभाळीत असतानाच गरजू, सुशिक्षित बेरोजगार तरुणांना व्यवसायासाठी सुलभ पद्धतीने कर्ज पुरवठा केला जातो. इतकेच नव्हे तर ठेवींवर देखील योग्य व्याज दर दिला जात आहे. तर सामाजिक बांधिलकी देखील तितकीच जपली जात आहे.
चिपळूण नागरीच्या ५० शाखांच्या माध्यमातून आर्थिक व्यावसायिकता संभाळताना- पारदर्शक कारभार पाहताना दि. ३१ डिसेंबर २०२४ अखेर भाग भांडवल ७५ कोटी ७ लाख (एवढे मोठी भागभांडवल असणारी महाराष्ट्र तील संस्था), स्वनिधी १६० कोटी ३५ लाख, एकूण व्यवसाय २१०० कोटी आहे.
तसेच चिपळूण नागरीने सभासदांना बचतीची सवय लागावी यासाठी अनेक योजना सुरू केले आहेत. यामध्ये धनसिद्धी ठेव, श्री स्वामी समर्थ ठेव, सिद्धी ठेव, राष्ट्र अमृत महोत्सव ठेव, संकल्प ठेव, श्रावण मास ठेव, समृद्धी ठेव, गणेश ठेव, उत्कर्ष व धनसंचय ठेव या ठेव योजनेबरोबरच सुयश, अल्पमुदत, आवर्त, बचत, स्वावलंबी बचत, धनवर्धनी, दाम दुप्पट, दाम तिप्पट या ठेव योजनांचा समावेश आहे. या योजनेत हजारो सभासद सहभागी झाले आहेत. एकंदरीत चिपळूण नागरीची यशस्वी वाटचाल सुरू आहे.
मा. विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था कोकण विभाग व कोकण विभाग नागरी सहकारी पतसंस्था मर्या. अलिबाग या दोन संस्थांनी चिपळूण नागरी पतसंस्थेचे एकत्रित व्यवसाय ५०० कोटी रुपयांच्या पुढे असल्याने ‘चिपळूण नागरीची कोकण पतसंस्था भूषण २०२५’ या पुरस्कारासाठी काही दिवसांपूर्वी निवड केली.
हा पुरस्कार दिनांक १६ फेब्रुवारी रोजी क्षात्रैक्य समाज हॉल, कुरुळ- अलिबाग येथे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार चिपळूण नागरी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन सुभाषराव चव्हाण, व्हाईस चेअरमन अशोक साबळे, संचालिका सौ. स्मिता चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्वप्ना यादव, प्रशांत यादव, संचालक सोमा गुडेकर, राजेंद्र पटवर्धन, रवींद्र भोसले व्यवस्थापक महेश खेतले,प्रशांत वाजे, अविनाश गुढेकर,गणेश कदम,संदीप पाटील,वैभव चव्हाण आदिनी स्वीकारला.
यावेळी महाराष्ट्र राज्य निवडणूक प्राधिकरणाचे आयुक्त अनिल कवडे, कोकण विभाग नागरी सहकारी पतसंस्था संघ मर्यादित अलिबागचे अध्यक्ष गिरीश तुळपुळे, भाजपा रायगड लोकसभा प्रमुख सतीश धारप, सेवानिवृत्त सहकार आयुक्त शैलेश कोतमिरे , शैलेश नाईक कमळ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित अलिबाग अध्यक्ष नंदकुमार चाळके, सुरेश पाटील, संतोष इचके आदी उपस्थित होते.
चिपळूण नागरीची यशस्वी वाटचाल संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्वप्ना यादव यांच्या मार्गदर्शनाखाली व संचालक मंडळासह अन्य अधिकारी व कर्मचारी वर्ग तसेच सभासद, हितचिंतकांच्या सहकार्याने सुरू आहे. या पुरस्काराबद्दल चिपळूण नागरी वर कौतुकाचा वर्षाव होत आहे.