रत्नागिरी:-कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करून मराठी भाषा गौरव दिन संकल्प चित्र स्पर्धा मुंबईतील मराठी वृत्तपत्र लेखक संघाने आयोजित केली आहे.
कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय (AI) हे सध्या जगभरात वेगाने विकसित होणारे तंत्रज्ञान आहे.
ही आधुनिक तंत्रज्ञानातील एक महत्त्वाची क्रांती ठरणार आहे. योग्य वापराने हे तंत्रज्ञान समाजाला अधिक प्रगत आणि सुसंवादी बनवू शकते. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मानवी बुद्धिमत्तेसारखे शिकण्याची क्षमता यंत्रांमध्ये आणि त्या यंत्रामधील सॉफ्टवेअर प्रोग्रॅम्समध्ये तयार करण्यासाठी वापरले जाते. याद्वारे भूत, भविष्य आणि वर्तमान काळातील चित्र उभारले जाऊ शकते. या तंत्रज्ञानाचा सर्वच क्षेत्रात झपाट्याने विकास होत असल्याने साहित्य क्षेत्रातदेखील वापर सुरू झाला आहे.
मराठी वृत्तपत्र लेखक संघातर्फे २७ फेब्रुवारी या दिवशी दादर सार्वजनिक वाचनालय आणि धुरू हॉल ट्रस्ट आणि मराठी विचारधारा प्रतिष्ठान (गोरेगाव, मुंबई) यांच्या सहकार्याने कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर यांच्या जन्मदिनी मराठी भाषा गौरव दिवस साजरा करण्यात येतो. त्यानिमित्ताने श्री सर्वोदय एज्युकेशनल ट्रस्टच्या सहकार्याने संघाच्या वतीने एआय तंत्रज्ञानाचा वापर करून मराठी भाषा गौरव दिन संकल्प चित्र स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. सर्वोत्कृष्ट तीन चित्रांना रोख पारितोषिके आणि सहभागी होणाऱ्या सर्वांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
चित्राची इमेज २५ फेब्रुवारीपर्यंत Chalval1949@gmail.com या ईमेलवर किंवा ८७७९९८३३९० या व्हॉट्स अॅप क्रमांकावर पाठवावी. अधिक माहितीसाठी स्पर्धा प्रमुख राजन देसाई यांच्याशी संपर्क साधावा. एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता मराठी भाषेसाठी किती उपयुक्त या विषयावर गेली ३० वर्षे संगणक क्षेत्रात अध्यापन करणारे भानुदास साटम यांचे व्याख्यान आणि अभिजात मराठी भाषा चला ज्ञानभाषा करू या या राज्यस्तरीय लेखस्पर्धेचे पारितोषिक वितरण या कार्यक्रमात होणार आहे.