रत्नागिरी:-येथील फिनोलेक्स ॲकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजीच्या इलेक्ट्रिकल विभागातर्फे द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी ‘अर्डिनो: बेसिक्स टू ऑटोमेशन अँड रोबोटिक्स’ ही दोन दिवसीय कार्यशाळा पार पडली.
कार्यशाळेत ६० हुन अधिक विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. कार्यशाळेत विद्यार्थ्यांना होम ऑटोमेशन, स्मार्ट सिंचन प्रणाली, अडथळा शोधणारी यंत्रणा आणि लाइन फॉलोअर रोबो यासारख्या स्वयंचलित प्रणालींबाबत प्रत्यक्ष अनुभव मिळाला. तांत्रिक कौशल्यांसह त्यांनी विविध सेन्सर आणि इलेक्ट्रॉनिक घटकांचा वापर करून प्रकल्प विकसित केले. कार्यशाळेदरम्यान प्रोग्राम केलेली रोबो कार आणि लाइन फॉलोअर रोबो कार या दोन स्वयंचलित यंत्रणांचे यशस्वी प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांना या तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष अनुभूती मिळाली. प्रा. रूपेश इंगळे यांनी अर्डिनो युनो प्रोग्रामिंग, सेन्सर इंटरफेसिंग, ऑटोमेशन आणि रोबोटिक्स यावर सखोल मार्गदर्शन केले, तर इलेक्ट्रिकल विभागाचे प्रमुख डॉ. जयंत माने यांनी अर्डिनोचा वैयक्तिक व औद्योगिक प्रकल्पांमध्ये वापर कसा करता येईल यावर भर दिला. ही कार्यशाळा प्रा. रूपेश इंगळे आणि डॉ. जयंत माने यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कौशल प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी केली. कार्यशाळेचे संयोजन प्रा. सुदीप हालदार यांनी केले. विद्यार्थ्यांनी या उपक्रमातून आधुनिक तंत्रज्ञानाच्या उपयोगाची सखोल माहिती मिळाल्याचे सांगितले. त्यांनी यापुढे स्वतंत्रपणे रोबोट तयार करण्याची आत्मविश्वासपूर्वक तयारी असल्याचेही मत व्यक्त केले.