रायगड: जिल्ह्यातील महाड MIDC पोलिस ठाण्यात तीन तलाक प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीन वेळा तलाक बोलून पत्नीला बेकायदा घटस्फोट दिल्याच्या या प्रकरणात पतीसह सासू, सासरे आणि इतर नातेवाईकांविरोधात कारवाई करण्यात आली आहे.
मुंबई आणि कोकण परिसरात अशा स्वरुपाचा हा दुसरा गुन्हा असल्याचे सांगण्यात येत आहे.
अब्दुल रहेमान इसाने असे आरोपी पतीचे नाव असून, पीडित महिलेचा विवाह 2022 मध्ये अब्दुल सोबत झाला होता. विवाहानंतर अब्दुल कामानिमित्त परदेशात गेला. दरम्यान, त्याच्या आई-वडिलांनी पीडितेकडून एक कोटी रुपये आणि बिरवाडी शहरातील वडिलांचा फ्लॅट व्यवसायासाठी मागितला.
मात्र, तिने यास नकार दिल्यानंतर सासू-सासऱ्यांनी तिला शारीरिक आणि मानसिक छळ दिला. तिच्यावर वारंवार दबाव टाकून, मारहाण करून तिच्या दागिन्यांवरही कब्जा करण्यात आला. त्यानंतर तिला जबरदस्तीने घराबाहेर काढण्यात आले. परदेशात असलेल्या अब्दुलला याविषयी माहिती देण्यात आली.
घरी परतल्यानंतर त्याने कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न करता पत्नीला तीन वेळा तलाक बोलून नातेसंबंध तोडल्याची घटना घडली. देशात तीन तलाकवर बंदी असूनही अशा प्रकारे बेकायदा तलाक दिल्यामुळे त्याच्यासह त्याच्या कुटुंबीयांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी महाड MIDC पोलिस ठाण्यात सखोल तपास सुरू असून, संबंधित नातेवाईकांविरोधात कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.