देवरुख- देवरुख नजीकच्या पाटगाव गवंडीवाडीतील तरूणाचा कोल्हापूर जिल्ह्यातील मलकापूर येथे अपघाती मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी सायंकाळी घडली आहे. अमर अशोक पांचाळ (वय-२२) असे मृत तरुणाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अमर पांचाळ याचे मुळ गाव संगमेश्वर तालुक्यातील नांदळज असून कामानिमित्त पांचाळ कुटुंबिय गेली अनेक वर्षे पाटगाव गवंडीवाडी येथे वास्तव्यास आहे. शनिवारी अमर पांचाळ व रोशन लिंगायत हे कामानिमित्त मोटारसायकलने मलकापूर येथे गेले होते. काम आटोपल्यानंतर दोघेही परतीचा प्रवास करत असताना त्यांच्या मोटारसायकलचा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता कि अमरच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
तर त्याच्यासोबतचा रोशनच्या पायाला दुखापत झाली आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अमरच्या अपघाती मृत्यूची बातमी पाटगाव व नांदळजमध्ये समजताच हळहळ व्यक्त करण्यात आली. तर त्याचा मृतदेह रविवारी सकाळी पाटगाव येथे आणण्यात आल्यावर शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, अमर पांचाळ या हरहुन्नरी तरूणाच्या अपघाती मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे. अमरच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे.