सोमेश्वर येथील गोशाळेला दिली देणगी तर एका गायीचे स्वीकारले दत्तकत्व
रत्नागिरी:- गोसंवर्धन आणि समाजसेवा यासाठी समर्पित भावनेतून फाटक हायस्कूलमधील १९७७ च्या दहावी बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन सोमेश्वर शांतिपीठ विश्वमंगल गोशाळेसाठी देणगी दिली आहे. संतोष खटावकर, संजय साळवी आणि मित्रपरिवाराने देणगी दिली आहे. तसेच माजी विद्यार्थ्यांनी एका गायीचे दत्तकत्वही स्वीकारले आहे.
भारतीय संस्कृतीत गायीला माता म्हणून पुजले जाते. गोसंवर्धन हे पर्यावरणपूरक, शेतीपूरक तसेच आरोग्यासाठीही उपयुक्त आहे. याच उद्देशाने फाटक हायस्कूल १९७७ बॅचने गायीचे दत्तकत्व स्वीकारण्याचा निर्णय घेतला. या माध्यमातून गायीच्या देखभालीसाठी, आहारासाठी आणि आरोग्यसेवेसाठी आर्थिक मदत मिळणार आहे.
सोमेश्वर शांतिपीठ विश्वमंगल गोशाळा ही गायींच्या संरक्षण, संवर्धन आणि पुनर्वसनासाठी कार्यरत असलेली संस्था आहे. गायींना नैसर्गिक आणि शांत वातावरणात ठेवून त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते. याशिवाय, गोशाळेतून शेतीसाठी जैविक खत, गोमूत्र, पंचगव्य उत्पादने तयार केली जातात. ज्याचा उपयोग पर्यावरणपूरक शेती आणि आरोग्य संवर्धनासाठी होतो.
या पवित्र कार्यासाठी योगदान देणाऱ्या सर्व माजी विद्यार्थ्यांचे सोमेश्वर शांतिपीठ विश्वमंगल गोशाळेच्यावतीने आभार व्यक्त केले आहेत. या मदतीमुळे एका गायीला उत्तम संगोपन मिळणार असून, या योगदानामुळे गोशाळेच्या सेवा आणि सुविधा अधिक बळकट होतील, अशी अपेक्षा गोशाळेतर्फे व्यक्त करण्यात आली.