जलालुद्दीन राजपूरकर यांचा पुढाकार
खेड : खेड-भरणे रस्त्याची दुरवस्था झाली असून संबंधीत विभागाकडे वारंवार डागडुजीची मागणी करुन सुध्दा याकडे दुर्लक्ष केले जात आहे. शासनाकडे याकामी पैसे नसतील तर भीक मागून हे काम करावे, यासाठी आपण २४ फेब्रुवारी रोजी भीक मागो आंदोलन करणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते जलालुद्दीन राजपूरकर यांनी दिली.
शहरातील पेन्शनर्स हॉलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या आंदोलनाला खेडमधील तीनबत्ती नाका येथील हुतात्मा अनंत कन्हेरे चौकातून सुरुवात होणार असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियांत्यांना प्रमुख पाहुणे म्हणून पाचारण केल्याचे राजपूरकर यांनी सांगितले. गेल्या अनेक
महिन्यांपासून खेड शहरासह तीन तालुक्याला जोडणाऱ्या भरणे-खेड या मार्गाची अवस्था दयनीय झाली आहे. जागोजागी खड्डे पडले असून अनेक ठिकाणी गटारालगत रस्ता खचल्याने वाहन चालवणे कठीण झाले आहे. तसेच पादचाऱ्यांना देखिल येथून चालणे मुश्किल झाले आहे. शासनाकडे वारंवार निवेदने देऊन देखील याकडे दुर्लक्ष होत असून अखेरीस सामाजिक कार्यकर्ते जलालुद्दीन राजपूरकर यांनी खेड भरणे रस्त्याच्या डागडुजीसाठी शासनाकडे पैसे नसतील तर भीक मागून त्याद्वारे जमा झालेल्या रक्कमेतून तरी शासनाने रस्त्याची डागडुजी करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली असून यासाठी ते येत्या २४ फेब्रुवारी रोजी भीक मागो आंदोलन सुरु करणार आहेत.