कळंबस्ते ग्रामस्थांची महामार्ग कार्यालयावर धडक
चिपळूण:- मुंबई-गोवा महामार्ग कामात नव्याने तयार करण्यात आलेले अंतर्गत रस्ते, गटारे व काँसिंग अपघातास निमंत्रण देत असून मोठी डोकेदुखी ठरत आहेत. शहरालगतच्या कळंबस्तेतील ग्रामस्थांनी याप्रश्नी राष्ट्रीय महामार्ग उपविभाग कार्यालयावर धडक देत विविध समस्यांकडे लक्ष वेधले आहे.
कळंबस्ते नाका येथे महामार्गावर तयार करण्यात आलेल्या क्रॉसिंगमुळे येथे अपघात सत्र सुरु असून वाहनचालक, तसेच ग्रामस्थ जीव मूठीत घेऊन येथून प्रवास करीत आहेत.
येण्या जाण्यासाठी उभारण्यात आलेला अंडरपास सोयीचा असून क्रॉसिंग कायमस्वरुपी बंद करावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. तसेच अंतर्गत रस्त्यावर अंडरपास मार्गाकडे जाण्यासाठी दिशादर्शक फलक लावावा, अशी मागणीही या निवेदनातून करण्यात आली आहे. तसेच हा परिसर गजबजलेला असल्याने येथे सीसीटीव्ही कॅमेरा बसवावा, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. याप्रश्नी सामाजिक कार्यकर्ते संजय गमरे, तंटामुक्त समिती अध्यक्ष विजय जाधव, रिक्षा संघटनेचे संतोष शिगवण, सुरेश खेराडे, विलास शिरगावकर, नंदु राक्षे, तसेच कळंबस्तेतील ग्रामस्थांनी महामार्ग अधिकाऱ्यांशी चर्चा केली व मागण्यांचे निवेदन सुपुर्द केले. ग्रामस्थांच्या मागणीनुसार कळंबस्ते नाका येथील क्रॉसिंग पिंप टाकून तात्पुरती बंद करण्यात आली आहे.