लांजा:-रात्रीच्या सुमारास मुचकुंदी नदीच्या खाडी पात्रात मासे पकडण्यासाठी गेलेल्या हर्चे पनोरेची वरचीवाडी येथील ६२ वर्षीय प्रौढाचा पाण्यात बुडून दुदैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी उघडकीस आली.
हर्चे-पनोरेची वरचीवाडी येथील शांताराम गणपत नरसळे (वय ६२) हे शेती व मासेमारीचा व्यवसाय करीत असत. ते शनिवारी १५ फेब्रुवारी रोजी रात्री ८.३० वा. दरम्याने मासे पकडण्यासाठी नेहमी प्रमाणे मुचकुंदी नदी खाडीच्या पात्रांमध्ये गेले होते. मात्र बराच उशीर झाल्याने ते घरी न आल्याने त्यांची पत्नी व वाडीतील ग्रामस्थांनी मुचकुंदी नदी खाडी पात्रामध्ये त्यांचा शोध घेण्यासाठी गेले असता त्यांना किनाऱ्यावर शांताराम नरसळे यांच्या चप्पल दिसून आल्या. मात्र ते कुठेच आढळून आले नाहीत दरम्याने शांताराम यांचा मुलगा प्रतिक हा मुंबई नालासोपारा येथे राहत असल्याने त्याचा चुलत भाऊ प्रशांत यांने त्याला फोन करून वडील मासे मारण्यासाठी गेले होते. त्याचा शोध घेत असताना ते कुठेच आढळून आलेले नाहीत अशी माहिती दिली.
तर रात्रभर शोध घेवून देखील शांताराम नरसळे हे आढळूण न आल्याने रविवारी १६ फेब्रुवारी रोजी सकाळपासून पुन्हा शोध मोहीम हाती घेण्यात आली. तरी देखील त्यांचा ठावठिकाणा लागत नव्हता. सायंकाळी ३.३० वा. शेळवी येथील मुचकुंदी नदी खाडी पात्रामध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला.
या घटनेची खबर मुलगा प्रतिक याने लांजा पोलीसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. याबाबत अधिक तपास पोलीस करीत आहेत.