रत्नागिरी:- रत्नागिरीत येत्या २४ फेब्रुवारीपासून तीन दिवसांची भारतीय गणित कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
दिल्लीतील केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालयाच्या अर्थसाह्याने कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र, रत्नागिरी उपकेंद्र, वेदांग ज्योतिष विभाग आणि गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या संस्कृत विभागाच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा होणार आहे.
गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात २४ ते २६ फेब्रुवारी या काळात दररोज सकाळी ११ ते सायंकाळी साडेचार या वेळेत ही कार्यशाळा होणार आहे.
भारताच्या प्राचीन ज्ञानपरंपरेत गणितशास्त्राच्या विद्वत्परंपरेला इतिहास आहे. प्राचीन काळातील आर्यभट्ट इत्यादींपासून आधुनिक काळातील रामानुजन, व्यंकटेश बापूजी केतकर यांच्यापर्यंत ही परंपरा काळानुरूप समृद्ध होत आहे. भारतीय गणितशास्त्राचे महत्त्व, त्याची परंपरा, महत्त्वाचे ग्रंथ, बीजगणित आणि वैदिक गणित यामधील भारतीयांचे योगदान नव्या पिढीला समजावे या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे.
गणित, विज्ञान किंवा अभियांत्रिकी शाखेचे विद्यार्थी संशोधक, शिक्षक आणि प्राध्यापक गणित विषयाचे जिज्ञासू या कार्यशाळेत सहभाग घेऊ शकतील. कार्यशाळेत सहभागी होऊन भारतीय गणिताची वैज्ञानिक परंपरा समजून घ्यावी, असे आवाहन कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे कुलगुरू प्रो. हरेराम त्रिपाठी, प्राचार्य मकरंद साखळकर, संचालक डॉ. दिनकर मराठे, गोगटे महाविद्यालयाच्या संस्कृत विभाग प्रमुख डॉ. कल्पना आठल्ये यांनी केले आहे.
कार्यशाळेत सहभागी होणाऱ्यांना प्रमाणपत्र देण्यात येईल. सर्व सहभागींची दुपारची भोजन व्यवस्था करण्यात येणार आहे. अधिक माहिती आणि नावनोंदणीसाठी प्रा. प्रज्ञा भट (७४९८०२१५२५) किंवा प्रा. कश्मिरा दळी (९०२८४९४१९९) यांच्याशी संपर्क साधावा.