चिपळूण:- तालुक्यातील कोळकेवाडी येथून वाशिष्ठी नदीत सोडल्या जाणाऱ्या कमी पाण्यामुळे गोवळकोट परिसर, तर ग्रॅव्हिटीच्या कामामुळे अन्य भागातील पाणीपुरवठा विस्कळित झाला आहे.
चिपळूण पालिकेकडून सोडल्या जाणाऱ्या पाण्याच्या वेळेत मोठा बदल झाल्याने महिलांचे वेळापत्रक बिघडले आहे. काही भागात टँकरने पाणीपुरवठा होत आहे.
शहराचा पाणीपुरवठा वाशिष्ठी नदीच्या पाण्यावर अवलंबून आहे. मात्र ही नदी बारमाही नसल्याने उन्हाळ्यात कोळकेवाडी येथे होणाऱ्या वीजनिर्मितीनंतर सोडल्या जाणाऱ्या पाण्यावर योजना चालतात. अर्ध्या शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी खेर्डी-माळेवाडी येथे जॅकवेलजवळ नदीत बंधारा बांधल्याने तेथे कायम पाणी असते. त्यामुळे येथून पाणीपुरवठा करण्यात अडचण येत नाही. मात्र सध्या ग्रॅव्हिटी योजनेच्या साठवण टाक्यांची कामे डीबीजे महाविद्यालय परिसर, खेड आदी भागात सुरू असल्याने येथून होणारा पाणीपुरवठा विस्कळित झाला आहे. त्यामुळे अनेक भागातील पाणीपुरवठा विस्कळित झाला आहे.