रत्नागिरी:-कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने १९९९ साली सुरू केलेल्या “रोल ऑन-रोल ऑफ” (रोरो) सेवेला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. ही सेवा ट्रक वाहतुकीसाठी एक पर्यावरणपूरक, सोयीस्कर आणि विश्वासार्ह पर्याय ठरली आहे.
या सेवेचा लाभ घेण्यासाठी आता कोकण रेल्वेशी थेट संपर्क साधता येईल.
रोरो सेवांचे मार्केटिंग आणि ऑपरेशनचे कंत्राट एका खासगी कंपनीला देण्यात आले होते. या कंपनीशी असलेला करार १४ फेब्रुवारी रोजी संपुष्टात आला आहे. त्यामुळे सर्व ट्रक मालक आणि चालकांनी कोलाड आणि सुरतकल स्थानकांवरील बुकिंग कार्यालयात थेट संपर्क साधावा, असे सूचित करण्यात आले आहे.
रोरो सेवा पर्यावरणपूरक आणि इंधन बचत करणारा पर्याय आहे. वाहतूक कोंडी आणि प्रदूषण कमी करणारी सुविधा म्हणून रोरो सेवेकडे पाहिले जाते. या सेवेचा लाभ घेतल्याने वेळेची बचत आणि वाहतुकीस अधिक सुरक्षितता प्राप्त होते. कोलाड ते सुरतकल मार्गावर रोरोची अखंड सेवा सुरू आहे. यापुढेही ती नियमितपणे सुरू राहणार असून, अधिक माहितीसाठी आणि दर जाणून घेण्यासाठी www.konkanrailway.com या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन कोकण रेल्वेने केले आहे.