रत्नागिरी:-मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील फलाटांच्या विस्तारीकरणाचे काम सुरू असल्याने याचा परिणाम कोकणातून जाणाऱ्या तीन गाड्यांवर होणार आहे.
कोकणातून सीएसएमटीपर्यंत धावणाऱ्या या गाड्या २८ फेब्रुवारीपर्यंत ठाणे आणि दादर स्थानकांपर्यंतच धावणार आहेत.
गेल्या वर्षीपासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या विस्तारीकरणाची कामे सुरू आहेत. सद्यःस्थितीमध्ये फलाट क्रमांक १२ व १३ चे काम रेल्वेने हाती घेतले आहे. या कामांमुळे कोकणातून सीएसएमटीपर्यंत धावणाऱ्या गाड्यांच्या अंतिम स्थानकांमध्ये बदल करण्यात आला आहे. त्यानुसार गाडी क्रमांक १२१३४ मंगळूर एक्स्प्रेस ही गाडी ठाण्यापर्यंत धावणार आहे. तर, गाडी क्रमांक १२१२० मडगाव सीएसएमटी तेजस एक्स्प्रेस आणि गाडी क्रमांक १२०५२ मडगाव सीएसएमटी जनशताब्दी एक्स्प्रेस या दोन गाड्या दादरपर्यंतच धावणार आहेत. त्यामुळे कोकणातून सीएसएमटीपर्यंत जाणाऱ्या प्रवाशांना अंतिम स्थानक म्हणून दादर येथे उतरावे लागणार आहे. त्यांना दादरपासून पुढील प्रवासाकरिता अन्य रेल्वे व इतर वाहनांचा आधार घ्यावा लागणार आहे.