रत्नागिरी:-माणसातील प्रतिभेविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी काहीतरी सांगण्याची अनिवार ऊर्मी माझ्यासारख्या लेखकाला लिहायला प्रवृत्त करते, असे प्रतिपादन रत्नागिरी बार असोसिएशनचे अध्यक्ष व लेखक ऍड.विलास पाटणे यांनी येथील रोटरी क्लबच्या कार्यक्रमात केले.
झाशीची राणी, रामशास्त्री प्रभुणे, न्या. एच. आर. खन्ना यांच्या जीवनाचा पट पाटणे यांनी उलगडून त्यांचा संघर्ष,त्याग, धैर्य अधोरेखित केले . ते म्हणाले, स्वत:च्या जगण्यातला संघर्ष समाजातील इतर अनेकांच्या जगण्यातही आहे. शब्दाला सौंदर्य, स्वभाव आणि व्यक्तित्व असू शकते हे मला कुसुमाग्रज, पुल देशपांडे यांच्या साहित्यामुळे उमजले. मी लिहितो, कारण मला काही सांगायचे असते. वाचनामागे आणि लिखाणामागे माझ्यातील कुतूहल असते. सौंदर्य, चांगुलपणा मला शब्दबद्ध करायला आवडते. लढणाऱ्या माणसात पराक्रम, धैर्य असते. कारण प्रत्यक्षात हीच माणसे इतिहास घडवणारी असतात. त्यांची धडपड, संघर्ष, त्याग आणि योगदानाचा पट उलगडून रसिक वाचकांसाठी मांडायचा माझा प्रयत्न असतो, असेही ते म्हणाले.माझ्या लेखनात जगण्याची उमेद आणि ऊर्जा दिसते. मनाच्या कोपऱ्यात तेवणारा दिवा अक्षरसाहित्याचा आहे. याच प्रकाशात वाटचाल सुरू आहे. असे करता करता केव्हा तरी रस्ता सापडतो आणि हातातल्या दिव्याच्या प्रकाशात दिशा स्पष्ट होते. याच अक्षरांनी मलाच माझी ओळख झाली. त्यातच मी समाधानी आहे आणि आनंद आहे, असे पाटणे यांनी सांगितले.
क्लबचे प्रेसिडेंट रूपेश पेडणेकर यांनी सन्मानचिन्ह देऊन पाटणे यांचे स्वागत केले, तर सचिव मनीष नलावडे यांनी परिचय करून दिला. कार्यक्रमाला सिनिअर रोटेरिअन कॅप्टन दिलीप भाटकर, धरमसी चौहान, प्रकल्प आराध्ये, असिस्टंट गव्हर्नर इलेक्ट श्रीकांत भुर्के, प्रेसिडेंट इलेक्ट प्रमोद कुलकर्णी, नीलेश मुळ्ये, मंदार सावंतदेसाई, प्रसाद मोदी, सचिन मुकादम, वेदा मुकादम आदी मान्यवर तसेच रोटरी क्लबचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.