रत्नागिरी:-दानशूर भक्तश्रेष्ठ भागोजीशेठ कीर यांच्या पुण्यतिथीनिमित्त येत्या २४ फेब्रुवारीला रत्नागिरीत मिरवणूक, सहभोजन, सहभजनाचा कार्यक्रम रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघाने आयोजित केला आहे.
दानशूर श्रीमान भागोजीशेठ कीर यांच्या ८१ व्या पुण्यतिथीनिमित्ताने सोमवार, दि. २४ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेनऊ वाजता खालच्या आळीतील श्री भैरव मंदिरापासून मिरवणुकीला प्रारंभ होईल. शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून दुपारी १२ वाजता या मिरवणुकीची सांगता पतित पावन मंदिरात होईल. त्यानंतर वैशिष्ट्यपूर्ण कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव केला जाईल.
पतित पावन मंदिराच्या कलशारोहण कार्यक्रमाच्या वेळी २४ फेब्रुवारी १९३१ रोजी स्वा. सावरकर आणि श्रीमान भागोजीशेठ कीर यांच्या संकल्पनेतून स्पृश्यास्पृश्यता, भेदभाव मिटवणारे सर्व समाजाचे सहभोजन आणि सहभजन पार पडले होते. ते सहभोजन २४ फेब्रुवारी १९४४ पर्यंत सुरू होते. भागोजीशेठ यांच्या निधनानंतर ७८ वर्षे हे सहभोजन बंद पडले होते. ते २०२२ पासून पुन्हा सुरू करण्यात आले. यावर्षीही ऐतिहासिक सहभोजन २४ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेबारा वाजता सर्व समाजांना एकत्र करून करण्यात येणार आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात सवर्ण-दलित भेदभाव मिटविण्यासाठी या पतित पावन मंदिराने देशामध्ये मोठी क्रांती केली होती. आज देशभक्ती, दानशूरता आणि प्रामाणिकपणा अंगीकारून पुन्हा एकदा देशसेवेसाठी सर्वांनी एकत्र येणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी सर्व समाजाच्या बंधुभगिनींनी या सहभोजनाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
याच कार्यक्रमाबरोबर स्वातंत्र्योत्तर काळात भागोजीशेठ कीर यांनी केलेल्या कार्याचा गौरव भजनाच्या माध्यमातून करण्यासाठी सहभजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यामध्येही सहभागी व्हावे, असे आवाहन अखिल भारतीय भंडारी समाज महासंघाचे अध्यक्ष नवीनचंद्र बांदिवडेकर, रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघाचे अध्यक्ष राजीव कीर, पतित पावन मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष उन्मेष शिंदे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी अॅड. सौ. प्रज्ञा दीपक तिवरेकर (९४०५६७४८५०, ८९८३५२४५९०) यांच्याशी संपर्क साधावा.