मुंबई : गावात शेतकामासाठी तसेच मुंबईतील झोपडपट्टी भागात वापरण्यात येणाऱ्या कोयत्याला ‘शस्त्र’ म्हणता येणार नाही. त्यामुळे कोयता जवळ बाळगला म्हणून कुणाला शस्त्रात्र कायद्यांतर्गत गुन्हेगार ठरवू शकत नाही, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण दिंडोशी सत्र न्यायालयाने एका प्रकरणात नोंदवले.
याचवेळी पत्नीची हत्या केल्याच्या आरोपाखाली दिंडोशी सत्र न्यायालयातील अतिरिक्त सत्र न्यायाधीश दत्ता ढोबळे यांनी पतीला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. मात्र शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत गुन्ह्यात मात्र निर्दोष मुक्तता केली. २७ फेब्रुवारी २०२० रोजी हत्येची घटना घडली होती. मालाड पूर्वेकडील सिद्धेश्वर नगरमध्ये तीन लहान मुलींसोबत राहणाऱ्या माय मोरे या महिलेची तिचा पती दिनेश मोरे याने हत्या केली. दिनेश हा पत्नीच्या चारित्र्यावर वारंवार संशय घ्यायचा. त्यातून दोघांमध्ये वाद होत असायचे. याच वादातून दिनेशने मायाची हत्या केल्याचा सरकारी पक्षाचा आरोप आहे. घटनेच्या पाच दिवसांपूर्वी मायाने दिनेशविरोधात कुरार पोलीस ठाण्यात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दाखल केली होती. त्यामुळे दुखावलेल्या दिनेशने कोयत्याने वार करून मायाला जीवे मारल्याचे पोलीस तक्रारीत म्हटले होते. याप्रकरणी पोलिसांनी हत्या व हत्या करण्यासाठी कोयता बाळगल्याने शस्त्रास्त्र कायद्यांअंतर्गत गुन्हा दाखल केला होता.
घटनेच्या दुसऱ्या दिवशी दिनेशला पोलिसांनी अटक केली. तेव्हापासून तो न्यायालयीन कोठडीत आहे. या प्रकरणात सरकारी पक्षाने सबळ पुरावे सादर करून हत्येचा गुन्हा सिद्ध केला. सबळ पुराव्यांची दखल घेत न्यायालयाने आरोपी दिनेशला पत्नीची हत्या केल्याच्या आरोपाखाली दोषी ठरवत जन्मठेप आणि दहा हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. मात्र शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत गुन्हा सिद्ध करण्यात सरकारी पक्षाला अपयश आल्याचे निरीक्षण नोंदवत आरोपी दिनेशची शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत गुन्ह्यातून निर्दोष सुटका केली.
न्यायालयाचे निरीक्षण
• कोयता हे शेती कामामध्ये वापरले जाणारे हत्यार असून गावामध्ये जवळपास सर्वच कुटुंबांत वापरले जाते. तसेच शहरात झोपडपट्टी वस्तीत कोयत्याचा वापर होतो.
• कोयता हे १९५९ च्या शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत प्रतिबंधित शस्त्र असल्याचे सरकारी पक्षाने कुठल्याही अधिसूचनेद्वारे सिद्ध केले नाही. कोयता जवळ बाळगण्यासाठी परवान्याची गरज असते हे देखील सरकारी पक्ष सिद्ध करू शकला नाही.
• केवळ धारदार शस्त्र गुन्ह्यात वापरले म्हणून आपोआप त्याचा बेकायदेशीर वापर केल्याचे म्हणता येणार नाही.
• सर्वसाधारणतः घरगुती वापरात असलेल्या वस्तू आणि कृषी हत्यारे शस्त्रास्त्र कायद्यात मोडत नाहीत. कोयता प्रतिबंधित शस्त्र नाही.