रत्नागिरीतील पदाधिकारी होणार सहभागी
कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठासाठी शासन आणि न्याय यंत्रणेचे लक्ष वेधण्यासाठी कोल्हापूरकर मंगळवारी (दि. 18) पुन्हा रस्त्यावर उतरत आहेत. विविध सामाजिक, औद्योगिक, व्यावसायिक, पक्षकार, सर्वपक्षीय खंडपीठ कृती समिती, श्रमजीवी संस्था, संघटनांच्या उपस्थितीत शहरातून लक्षवेध महारॅली काढण्यात येत आहे.
जिल्ह्यातील वकील, लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांसह पाच हजारांवर लोक या रॅलीत सहभाग होण्याची शक्यता आहे.
कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष तथा खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक अॅड. सर्जेराव खोत, ज्येष्ठ विधिज्ञ व महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष अॅड. महादेवराव आडगुळे, अॅड. रणजित गावडे, अॅड. अजितराव मोहिते यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ही महारॅली काढण्याचा निर्णय घेण्यात आला. कसबा बावडा येथील न्यायसंकुलातून सकाळी 10.30 वाजता महारॅलीला प्रारंभ होईल, शहरातील प्रमुख मार्गावरून रॅली जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचेल, असेही सांगण्यात आले.
स्मॅक सुवर्ण महोत्सव समितीचे अध्यक्ष सुरेंद्र जैन, कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष बाबा कोंडेकर, मॅकचे अध्यक्ष मोहन कुशिरे, गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष स्वरूप कदम, आयटीचे अध्यक्ष प्रताप पाटील, कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष कमलाकर कुलकर्णी, सेक्रेटरी प्रसन्न तेरदाळे, आयआयएफचे अध्यक्ष विजय खोबरे, शिवतेज महिला संघटनेच्या अध्यक्षा कविता कोंडेकर यांच्यासह पक्षकार, कृती समिती सदस्य मोठ्या संख्येने रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत, असेही अॅड. सर्जेराव खोत यांनी सांगितले. सकाळी जिल्हा व प्रमुख न्यायाधीश श्रीमती कविता अग्रवाल यांना निवेदन सादर करण्यात येईल. त्यांच्या मार्फत मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती यांच्याकडे हे निवेदन पोहोच करण्याचा उद्देश असल्याचे अॅड. खोत व अॅड. आडगुळे, रणजित गावडे यांनी सांगितले.
जिल्हा न्यायालय, धैर्यप्रसाद चौक, महाराणी ताराराणी चौक, व्हीनस कॉर्नर, दसरा चौक, बिंदू चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, सीपीआर चौक, खानविलकर चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर महारॅली पोहोचणार आहे. वकील व ज्येष्ठ विधिज्ञांनी ड्रेसकोडमध्ये महारॅलीमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे. जिल्ह्यातील चारही लॉ कॉलेजचे प्राचार्य, प्राध्यापकांसह विद्यार्थी, कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे पदाधिकारी, सदस्य, तालुका बार असोसिएशनचे पदाधिकारी सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हा बार असोसिएशनचे पदाधिकारीही महारॅलीमध्ये सहभागी होत आहेत, असेही अॅड. खोत यांनी सांगितले.