सातारा:-मधाची निर्मिती, संशोधन,अभ्यास तसेच ग्रामोद्योगाला चालना देण्यासाठी देशातील पहिल्या ‘हनी पार्क’ची निर्मिती थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वरमध्ये करण्यात आली आहे; तर दुसर्या हनी पार्कची निर्मिती मुंबईत केली जाणार आहे.
या हनी पार्कच्या माध्यमातून मध उत्पादन व मधमाशी याबाबत सर्व माहिती एकाच ठिकाणी मिळणार आहे.
एव्हरेस्ट उद्योग समूहाच्या सहकार्याने व महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या पुढाकाराने महाबळेश्वर येथे मधुबन हा प्रकल्प राबवला जात आहे. महाबळेश्वर येथील मध संचालनालयाच्या आवारातील तीन एकर जागेत मधुबन हा हनी पार्क उभारला आहे. या पार्कमध्ये 30 मधपेट्या ठेवण्यात आल्या आहेत. मधपेट्यांसह मध संकलन यंत्र, मध प्रक्रिया, स्वार्मनेट, राणी माशी पैदास उपकरण, पोलन ट्रॅप, टी वेल एंड फिडिंग, बी व्हेल आदी उपकरणे ठेवण्यात येणार आहेत. मधमाश्यांचा अभ्यास करण्यासाठी येणारे शेतकरी, मधपाळ, शालेय सहलीमधून येणारे विद्यार्थी आणि पर्यटक आदींना एकाच ठिकाणी मध उत्पादनांची सर्व माहिती प्रात्यक्षिकांसह मिळणार आहे.
महाबळेश्वर येथील मध संचालनालय पुढील काळात सेंटर ऑफ एक्सलन्स करण्याची मंडळाची कल्पना आहे. त्यादृष्टीने येथे झालेले मधुबन ही एक छोटी सुरुवात आहे. मधमाशी व मधमाशीपालन याविषयी अधिकाधिक प्रबोधन होण्याची आवश्यकता आहे. अशाच प्रकारे दुसरे मधुबन बोरिवली मुंबई येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात होणार आहे.
पावसाळ्यातील संभाव्य समस्या आणि फुले अथवा मकरंदाची उपलब्धता पाहून महाबळेश्वरात हनी पार्कची उभारणी करण्यात आली आहे. महाबळेश्वर येथे कुशल मनुष्यबळ उपलब्ध आहे. उद्यानात मनुष्यबळ नसल्यामुळे रोजगाराची गरज असलेल्या आदिवासी महिलांना प्रशिक्षण देऊन त्यांची नेमणूक केली जाणार आहे. हनी पार्कला भेट देण्यासाठी राज्यासह अन्य देशातील शेतकर्यांच्या सहली वाढणार आहेत. त्यांना एकाच छताखाली मध उत्पादन व मधमाशीबाबत सर्व माहिती मिळणार आहे.
– रवींद्र साठे, सभापती, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग महामंडळभविष्यात मधू पर्यटनसारखा (हनी टूरिझम)
प्रकल्प राबवून देश-विदेशातील पर्यटकांना महाबळेश्वरकडे आकर्षित करण्याचे प्रयत्न केले जातील. मधमाश्यांच्या संवर्धनासाठी लोकचळवळ उभी राहिली पाहिजे. त्या दृष्टीनेच मधुबन हनी पार्कची उभारणी हे पहिले पाऊल आहे. महाबळेश्वर येथील मध संचालनालय एक्सलन्स सेंटर व्हावे, असा प्रयत्न महामंडळाच्या माध्यमातून सुरू होत आहे.