मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठी गळती लागल्याचं पाहायला मिळत आहे. पक्षाला सोड चिट्ठी देत अनेकजण एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत तर काहीजण भाजपात प्रवेश करत आहेत. नुकतेच रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर-लांजा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजन साळवी यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
त्यानंतर ठाकरे गटाचे कोकणातील आमदार भास्कर जाधव हे देखील नाराज असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. मला माझ्या क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी मिळू शकली नाही, असे वक्तव्य भास्कर जाधव यांनी केले होते. मात्र, आपण नाराज नसल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेतून स्पष्ट केले. त्यानंतर आज त्यांनी व्हॉट्सअपला ठेवलेल्या स्टेटसवरुन पुन्हा एकदा भास्कर जाधव नाराज असल्याची चर्चा रंगली आहे.
आमदार भास्कर जाधव यांनी व्हॉट्सअपला लावलेल्या एका व्हिडीओची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे. या व्हिडीओमध्ये एक मेंढपाळ त्याच्या बकऱ्यांना, गुरांना आडवाटेवरुन, पाण्यातून रस्ता पार करत असल्याचे दिसत आहे.. व्हिडीओच्या खाली ‘म्होरक्या जिद्दी व धाडसी असेल तर माणसंच काय जनावरं पण विश्वास टाकतात. या व्हिडीओतून संघटना काय आहे आणि संघटना कशी घडवता येते याचा बोध घेण्यासारखा आहे’ असे भास्कर जाधव यांनी म्हटले आहे.
पत्रकार परिषदेत काय म्हणाले भासकर जाधव
मी न बोललेल माझ्या तोंडी घातल जातंय. पक्षाने संधी दिली नाही, असे म्हटलं नाही. गेल्या 43 वर्षामध्ये माझ्या क्षमतेप्रमाणे मला पुरेपूर काम करण्याची संधी मिळाली नाही. हा माझा शब्दप्रयोग आहे. कोणी दिली नाही, कोणत्या पक्षाने, नेत्याने दिली नाही, असा माझा आक्षेप नाही.
गेल्या ४३ वर्षांच्या राजकीय जीवनात कधीही कुठलीही गोष्ट मिळवण्याकरिता, पद मिळवण्याकरिता मी कधी नौटंकी केली नाही. मी कधी नाटकबाजी केली नाही, रडगाणं गात बसलो नाही. बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार हे उद्धव ठाकरेच आहेत. मी जे बोललो ते बाजूला ठेवले गेले आणि जे नाही बोललो त्याला प्रसिद्ध करण्यात आले.
मी कधी खोटे बोलत नाही. 43 वर्षांची माझी राजकीय कारकिर्द झाली आहे. कारकिर्दीच्या उत्तरार्धाला लागलेला मी कार्यकर्ता आहे. अडचणीच्या काळात आपल्या हातून चांगले काहीतरी घडावे यासाठी माझी तळमळ आहे, असंही भास्कर जाधव यांनी म्हटले.