मुंबई:- महायुती सरकारला प्रचंड बहुमताने सत्तेत आणणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. निकषात बसत नसतानाही लाभ घेणाऱ्या महिलांना योजनेतून वगळण्याचे काम सरकारने हाती घेण्यात आले आहे.
लाभार्थी महिलांची पडताळणी प्रक्रिया सुरू करण्यात आली असून आतापर्यंत सुमारे 5 लाख महिलांना या योजनेतून वगळण्यात आले आहे. पात्र महिलांनाच लाभ मिळवा यासाठी सरकारकडून आता कठोर पाऊले उचलली जात आहे.
प्रत्येक महिन्यात तिसऱ्या आठवड्यात लाभ
लाडकी बहीण योजनेबाबत आता आणखी एक मोठी अपडेट समोर येत आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच या योजनेचा फायदा पात्र महिलांनाच मिळवा यासाठी काही नवे नियम देखील लागू केले जाण्याची शक्यता आहे. मिळालेल्या महितीनुसार लाडक्या बहिणींना आता दर महिन्यात तिसऱ्या आठवड्यात लाभ मिळणार आहे. लाभार्थी महिला हयात आहे की नाही हे देखील तपासले जाणार आहे. यासाठी दरवर्षी जून ते जुलै दरम्यान ईकेवायसी करणे अनिवार्य करण्यात येणार आहे.
दरवर्षी ईकेवायसी करणे अनिवार्य
लाडकी बहिणी योजनेच्या नव्या नियमानुसार प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात हप्ता मिळणार आहे. लाभार्थी हयात आहे की नाही हे देखील तपासले जाईल. यासाठी दरवर्षी जून ते जुलै दरम्यान ईकेवायसी करणे अनिवार्य असेल. याशिवाय ज्या महिलांचे कौटुंबिक उत्पन्न 2,50,000 रुपयांपेक्षा जास्त आहे, त्यांना या योजनेतून वगळले जाणार आहे. प्रत्येक लाभार्थी महिलेचे इनकम टॅक्स रेकॉर्ड तपासले जाईल. तसेच अपात्र महिलांना वगळण्यासाठी जिल्हा स्तरावर फेरतपासणी करण्यात येईल. निकषात न बसणाऱ्यांना वगळण्यात येणार आहे.
आतापर्यंत 5 लाख महिलांना वगळले
महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी या योजनेत अपात्र ठरलेल्या महिलांचा आकडा सांगितला आहे. तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 28 जून 2024 आणि दिनांक 3 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आले आहे. यात संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या 2,30,000 महिला, वय वर्षे 65 पेक्षा जास्त असलेल्या 1,10,000 महिला, कुटुंबातील सदस्यांच्या नावे चारचाकी गाडी असलेल्या, नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या आणि स्वेच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या महिला 160,000 महिलांचा समावेश आहे. अशा एकूण 500000 महिला आतापर्यंत अपात्र ठरल्या आहेत.