खेड : तालुक्यातील बिजघर येथे ८५ हजार रुपये किंमतीचा विदेशी मद्यसाठा येथील पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने जप्त केला. मद्यसाठ्याची वाहतूक करताना रवींद्र दत्ताराम खळे (वालोपे-वरचीवाडी, चिपळूण) यास रंगेहाथ पकडले. तो एम.एच. ०८ ए.एस. १६८३ क्रमांकाच्या वाहनातून गोवा बनावटीच्या दारुची विनापरवाना वाहतूक करत होता. ही बाब पोलिसांना समजताच त्याला शिताफीने पकडले. पोलीस शिपाई राहुल कोरे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.