राज्यस्तरीय सिझन बॉल क्रिकेट स्पर्धेचे थाटात उद्घाटन
आमदार शेखर निकम, बाबाजी जाधव यांची उपस्थिती
असोसिएशनचे अध्यक्ष दशरथ दाभोळकर यांचा पुढाकार
चिपळूण : चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनचे करावे तेवढे कौतुक थोडे आहे. चिपळूण नगर पालिका, आमदार शेखर निकम यांच्या माध्यमातून त्यांनी पवन तलाव मैदानावर टर्फ विकेट तयार करून घेतली आहे. सिझन क्रिकेटला गतवैभव प्राप्त व्हावे, यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. असोसिएशनचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशन आणि इथल्या खेळाडूंमध्ये पॅशन आहे. आता हे पॅशन तुमच्या गुणवत्तेच्या जोरावर पुढे न्या आणि चिपळूणमधील खेळाडू राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळताना दिसू देत, असे प्रतिपादन रणजीपटू भाविन, ठक्कर यांनी केले.
चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनच्यावतीने शहरातील पवन तलाव मैदानावर आमदार चषक राज्यस्तरीय सिझन बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी या स्पर्धेचे थाटात उद्घाटन झाले. या वेळी भाविन ठक्कर यांनी उपस्थित क्रीडाप्रेमींशी संवाद साधला. फीत कापून मान्यवरांच्या हस्ते मैदानाचे उद्घाटन झाले. त्यानंतर टर्फ विकेटचेही आमदार शेखर निकम व भाविन ठक्कर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यानंतर बाळा, कदम सचिन कदम यांनी फलंदाजी केली, तर शेखर निकम, भाविन ठक्कर, मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी सिझवर गोलंदाजी केली.
प्रास्ताविक असोसिएशनचे अध्यक्ष दशरथ दाभोळकर यांनी केले. आमदार शेखर निकम यांच्या सहकार्यामुळे आज येथे टर्फ विकेट झाली आहे आणि पहिल्यांदाच टर्फ क्रिकेटवर राज्यस्तरीय सिझन बॉल क्रिकेट स्पर्धा होत आहे. चिपळूण नगर पालिकेचे चांगले सहकार्य असते, असे सांगितले. कबड्डी असोसिएशनचे राज्य सदस्य सचिन कदम यांनी नगर पालिकेला या मैदानाचे व्यवस्थापन करणे अवघड आहे, याची आम्हाला कल्पना आहे. असोसिएशनच्या माध्यमातून त्यांनी या मैदानाचे व्यवस्थापन नीट ठेवावे, अशी विनंती केली. आमदार शेखर निकम यांनी कबड्डी, क्रिकेट, खो-खो हॉलीबॉल अशा सर्वच खेळांसाठी आपले सातत्याने सहकार्य राहील, असे सांगून आपल्या निधीतून पवन तलाव मैदानावर पॅव्हेलियन व अन्य सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असे सांगितले.
स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी माजी उपनगराध्यक्ष सुचय रेडीज, सचिन कदम, बाळा कदम, माजी नगरसेवक भरत गांगण, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, प्रशिक्षक सचिन कोळी, सचिन केणी, युवा नेते अनिरुद्ध निकम, राष्ट्रवादीचे नेते जयद्रथ खताते, भाजपच्या नीलमताई गोंधळी, माजी सभापती पूजा निकम, जिल्हा बँक संचालिका दिशा दाभोळकर, माजी नगरसेवक सई चव्हाण, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे, मुख्याधिकारी विशाल भोसले, कार्यालयीन प्रमुख मंगेश पेढांबकर, रियाज खेरटकर, माजी नगराध्यक्ष रिहाना बिजले, आरपीआयचे राजू जाधव, प्रशांत देवळेकर, असोसिएशनचे सचिव राजेश सुतार, समालोचक सचिन कुलकर्णी, उदय ओतारी, माजी नगरसेवक शशिकांत मोदी व आशिष खातू, डॉ. अभिजित सावंत, डॉ. राजेश वाजे, सलीम पालोजी, सुयोग चव्हाण, रमेश राणे, उदय काणेकर, लतीफ परकार, योगेश बांडागळे, शशांक भिंगारे, प्रसाद देवरुखकर, सुनील रेडीज यांच्यासह असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, सदस्य आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाहीर शाहीर खेरटकर यांनी केले, तर समालोचनाची जबाबदारी प्रसिद्ध समालोचक प्रशांत आदवडे, बाबल्या जाधव, इब्राहिम सरगुरोह हे सांभाळत आहेत. आठ दिवस चालणाऱ्या या क्रीडा स्पर्धेला क्रीडा रसिकांनी भेट द्यावी, असे आवाहन अध्यक्ष दशरथ दाभोळकर यांनी केले आहे.