मुंबई:- पैशांचा पाऊस पडणे.. बऱ्याच लोकांचं हे स्वप्न असतं, पण मुंबईतील एका कार्यालयात खरोखरच पैशांचा पाऊस पडला. सर्वसामान्यांचे घरांचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या म्हाडा मुख्यालयाच्या कार्यालयात एक अजब प्रकार घडला.
म्हाडा कार्यालयात आलेल्या एका महिलेने अधिकाऱ्याच्या केबिनमध्ये जाऊन थेट पैशांच्या नोटाच उधळल्याचा प्रकार समोर आला आहे. मात्र या संपूर्ण घटनेनंतर सदर महिलेला सुरक्षा रक्षकांनी बाहेर काढले. मात्र हा गौडबंगाल नेमकं आहे तरी काय? अशी चर्चा म्हाडात याप्रकारानंतर रंगली होती.
म्हाडाच्या बांद्रे पूर्व येथील गृहनिर्माण भवन या मुख्यालयात मुंबई मंडळ, कोकण मंडळ, मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्निर्माण मंडळ, झोपडपट्टी सुधार मंडळ अशी विविध कार्यालये आहेत. दररोज 4 ते 5 हजार लोक हे विविध कामानिमित्त म्हाडा मुख्यालयात जात असतात, भेट देत असतात. शुक्रवारी दुपारी असाच कामाचा दिवस होता. मात्र तेव्हाच आंदोलन करणारी एक महिला दुपारच्या सुमारास दुसऱ्या मजल्यावरील एका अधिकाऱ्याच्या केबिनबाहेर आली.
त्यानंतर तिने तेथे त्या अधिकाऱ्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आपल्या बॅगेतील पैसे काढले आणि त्या नोटा केबिनमध्ये उधळल्या. एवढंच नव्हे तर तिने पैशांचा हारही केबिनच्या दरवाजाला घातला. हा प्रकार घडला तेव्हा संबंधित अधिकारी पाणी पिण्यास गेले असल्यामुळे ते केबिनमध्ये उपस्थित नव्हते. दरम्यान, या प्रकारानंतर म्हाडाच्या सुरक्षा रक्षकांनी आंदोलन करणाऱ्या महिलेला ताब्यात घेतले. मात्र मला हात लावाल तर या मजल्यावरून खाली उडी मारेन अशी धमकी महिलेने दिली होती. त्यानंतर तिला सुरक्षा रक्षकांनी तेथून हाकलून लावलं. या प्रकाराची सध्या सर्वत्र चर्चा रंगलेली आहे.