करजुवे खाडीत धामापूर येथे रात्रीच्या वेळी वाळू बेसुमार उपसा
▪️ वाळू वाहतूक करणाऱ्या डंपर वर कारवाई होणार का ?
▪️ तालुका प्रशासनाचे दुर्लक्ष
संगमेश्वर / प्रतिनिधी :- बेकायदा वाळू उपशा बाबत जिल्हाधिकाऱ्यानी सर्व तहसीलदारांना कठोर कारवाई करण्याच्या सूचना केलेल्या असतानाच संगमेश्वर तालुक्यात मात्र पोलीस आणि महसूल विभाग उप मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात व्यस्त असल्याचा फायदा उठवत गेले महिनाभर बंद असणारा बेकायदेशीर वाळू उपसा अचानक शुक्रवारी रात्री बिनधास्तपणे सुरु करण्यात आला आहे. शुक्रवारी सायंकाळनंतर अचानक असंख्य रिकामे डम्पर डिंगणी आणि आरवली मार्गवरून धामापूर येथे धावू लागले. याबाबत संगमेश्वर तालुक्याच्या महसूल प्रशासनाला कोणतीही माहिती मिळू नये याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी बेकायदा वाळू उपसा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा ईशारा दिलेला असताना धामापूर येथील वाळू उपसा कोणाच्या आशीर्वादाने आणि सहकार्याने सुरु करण्यात आला आहे ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
शासकीय कार्यालयांना शनिवार आणि रविवार सुट्टी असल्याने करजुवे खाडीत धामापूर येथे शुक्रवारी सायंकाळ नंतर सक्शन पंपाने बेसुमार वाळू उपसा केला जात आहे. शासकीय कार्यालयांना सुट्टी असल्यानंतर कोणतीही कारवाई होणार नाही हे लक्षात घेऊनच हा बेकायदा वाळू उपसा होत आहे.याबरोरच पोलीस प्रशासन उप मुख्यमंत्री यांच्या रत्नागिरी येथील दौऱ्यात काल पासून व्यस्त असल्याचा फायदा धामापूर येथील या वाळू व्यावसायिकाने उचलला असल्याने आता संगमेश्वर तहसीलदार जिल्हाधिकारी यांचा कारवाई करण्याचा आदेश प्रत्यक्ष अमलात आणतात का ? हे पाहावं लागेल. जिल्ह्याच्या उर्वरित भागात बेकायदा वाळू उपशावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले असतानाच संगमेश्वर तालुक्यात मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.
वाळू वाहतूक करणाऱ्या डंपर वर जप्तीची कारवाई करण्यात आली तरच या बेकायदा आणि चोरट्या वाळू उपाशाला प्रशासनाची जरब बसू शकेल. संगमेश्वर तहसीलदार आणि संगमेश्वर – देवरुख येथील पोलीस निरीक्षकांनी सायंकाळी डिंगणी, आरवली, संगमेश्वर याठिकाणी बेकायदा वाळू वाहतूक करणाऱ्या डम्परवर कठोर कारवाई केली तरच या चोरट्या व्यवसायाला आळा बसू शकेल. शुक्रवारी एकाच रात्री धामापूर येथून असंख्य डम्पर भरून वाळूची बेकायदा वाहतूक केली गेली आहे. यामुळे शासनाचा मोठया प्रमाणावर महसूल बुडाला आहे. संगमेश्वर तहसीलदार धामापूर येथील वाळू उपाशा बाबत कठोर भूमिका घेतात का ? याकडे आता पर्यावरण प्रेमिंचे लक्ष लागले आहे. धामापूर येथे शुक्रवारी बेकायदा वाळू उपसा सुरु झाल्यानंतर आता अन्य वाळू व्यावसायिक बेकायदा वाळू उपसा कारण्यासाठी सरसावले असून यामुळे करजुवे गावांत टोळी युद्ध भडकण्याची भिती व्यक्त केली जात आहे. संगमेश्वर पुनर्वसन येथील निवासी जागेवर भंगार व्यावसायिकांने सुरु केलेला बेकायदेशीर व्यवसाय असो, संगमेश्वर ग्रामीण रुग्णालया जवळ उभारण्यात येत असलेल्या बेकादेशीर इमारतीवर कारवाई करण्याचा प्रश्न असो अथवा दगड – माती उत्खनन याबाबत संगमेश्वर तहसीलदार यांना जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई करण्याच्या सूचना केल्या होत्या मात्र अद्याप यावर कारवाई न झाल्याने धामापूर येथील वाळू व्यावसायिकावर कारवाई होणार का ? ती वरील प्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाकडे दुर्लक्ष केले जाणार याकडे आता संगमेश्वरवासियांचे लक्ष लागून राहिले आहे.
पोलीस आणि महसूल विभाग उप मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात व्यस्त
