गोवा राज्याप्रमाणे महाराष्ट्रातही काजूला हमी भाव मिळण्याची मागणी
रत्नागिरी : गोवा राज्याप्रमाणे महाराष्ट्रातही काजूला हमी भाव मिळावा या मागणीसाठी शेतकरी, बागायतदार अविनाश काळे यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे.
हमी भाव न जाहीर झाल्यास येत्या २० फेब्रुवारीला जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषण करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यासंदर्भातील निवेदन काळे यांनी पालकमंत्री उदय सामंत, आमदार किरण सामंत, पोलीस आणि जिल्हा प्रशासनाला दिले आहे.
अविनाश काळे यांनी सांगितले की, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात हजारो काजू बागायतदार आहेत. गेली काही वर्षे गावठी आणि वेंगुर्ला बीचा दर ८० ते १०० किलोच्या दरम्यान आहे. सध्या काजू बागा साफ करणे, निगा राखणे, मजुरीचे गगनाला भिडलेले दर, विविध रोगांमुळे अपरिहार्य झालेली फवारणी, त्याचा खर्च, काजू बी धरल्यापासून पुढे सुकवून विकेपर्यंत होणारा खर्च, पडलेल्या बियांचे साळिंदर, उंदीर आणि इतर प्राण्यांपासून होणारे नुकसान यामुळे एक किलो बीसाठी येणारा खर्च जवळपास शंभर ते एकशे वीस रुपयांच्या पुढे जातो. मिळणाऱ्या कमी दरामुळे काजू बी उत्पादक उत्पन्न आणि खर्च यांचा ताळमेळ बसत नसल्याने संकटात आहेत. गेल्या वर्षी काजू बीसाठी काजू बोंडातून प्रतिकिलो दहा रुपये अनुदान शासनाने हंगाम संपताना जाहीर केले होते. बरेचसे शेतकरी वजन खूप होत असल्याने घरी येणाऱ्या खरेदीदाराकडे बिया विकतात. त्यामुळे त्यांचे नुकसान होते.
या साऱ्या बाबी लक्षात घेऊन काजू बीला शासनाने हमीभाव जाहीर करावा, अशी मागणी काळे यांनी केली आहे.