चिपळूण : सर्व श्रमिक संघटनेच्यावतीने गिरणी कामगार, त्यांचे वारसदार व कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच ईपीएस 95 निवृत्ती वेतन धारकांचा संयुक्त मेळावा शनिवार दि. 15 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता शहरातील विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन येथे आयोजित करण्यात आला आहे.
महाराष्ट्र सरकारने 15 मार्च, 2024 रोजी शासन निर्णय जारी करुन गिरणी कामगार व त्यांच्या वारसदारांचा मुंबईत घरे देऊन पुनर्वसन करण्याचा अधिकार काढून घेण्यात आलेला आहे. त्याऐवजी एमएमआरडीएच्या क्षेत्रात घरे देण्यासंबंधी धोरण जाहीर केले आहे. या धोरणाप्रमाणे मुंबई पासून सुमारे 100 किलोमीटर लांब असलेल्या ठाणे जिल्ह्यातील शेलु तसेच वांगणी येथे पडीक जमिनीवर गिरणी कामगारांची घरे देण्यासंबंधी विकासकांची नेमणूक केलेली आहे. ती घरे घेण्या संबंधी गिरणी कामगार वारसदारांना सांगण्यात येत आहे, ही एक प्रकारे गिरणी कामगार वारसदारांची फसवणूक आहे. सर्व श्रमिक संघटनेच्यावतीने सातत्याने गिरणी कामगार व वारसदारांना मुंबईतच घरे मिळाली पाहिजेत याबाबत आंदोलने केली जात आहे. आजही मुंबईच्या एनटीसी गिरण्यांच्या जमिनी उपलब्ध आहेत, इतरही जमिनी आहेत, त्या बिल्डरांना नफा कमविण्याकरीता द्यायच्या व गिरणी कामगार व वारसदारांना ग्रामीण भागात पडीक जमिनीवर घरे द्यायची, तीसुद्धा भरमसाठ किंमतीत द्यायची, या धोरणाच्या विरोधात राज्याच्या विधिमंडळाच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात मुंबईत मोठे तीव्र आंदोलन करण्याबाबतची रूपरेषा या मेळाव्यात जाहीर करण्यात येणार आहे.
याबरोबरच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी मधील निवृती धारकांची (ईपीएस 25 पेन्शनर्स) फसवणूक केंद्र सरकारकडून केली जात आहे, त्याबाबतही माहिती दिली जाणार असून पुढील लढ्याची दिशाही जाहीर करण्यात येणार आहे. या मेळाव्याला मार्गदर्शन करण्याकरता सर्व श्रमिक संघटनेचे नेते कॉम्रेड विजय कुलकण, कॉम्रेड बी. के. आंब्रे, कॉम्रेड संतोष मोरे उपस्थित राहणार आहेत. तरी या मेळाव्याला गिरणी कामगार व वारसदार तसेच ईपीएस 95 पेन्शन धारकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सर्व श्रमिक संघटनेतर्फे करण्यात आले आहे
गिरणी कामगारांच्या आंदोलनाची दिशा ठरणार आज चिपळुणात मेळावा,लढा तीव्र करण्यावर होणार निर्णय
