रत्नागिरी:कोकणातील राजापूर विधानसभेतील माजी आमदार राजन साळवी यांनी उद्धवसेनेचे शिवबंधन तोडत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत ठाण्यातील टेंभी नाका येथील आनंदाश्रमात शिंदेसेनेत प्रवेश केला.
पक्ष प्रवेशाच्या निमित्ताने शिंदेसेनेने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. साळवी यांच्या प्रवेशाने आता कोकणात शिंदेंची ताकद वाढली आहे. यावेळी त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला. यावरून ठाकरे गटातील नेत्यांनी राजन साळवी, एकनाथ शिंदे आणि शिंदेसेनेवर जोरदार टीका केली. यातच आता कोकणतील ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी भाष्य केले.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा एक-एक लचका तोडला जात आहे. पक्षाला चारही बाजूने घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे. याबाबत आमच्या चर्चा सुरू आहेत. आमच्या चर्चा कायम सुरू असतात. आमची चर्चेची पद्धती थोडी वेगळी आहे. आमचा पक्ष आदेशावर चालतो. पक्ष प्रमुख हे आमच्यासारख्या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करत असतात. राजन साळवी गेले म्हणजे संपूर्ण रत्नागिरी जिल्हा गेला असे नाही, असे भास्कर जाधव यांनी म्हटले आहे.
शिवसेना राख साचलेल्या निखाऱ्यासारखी झाली
बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना उभी करण्यासाठी आपले आयुष्य वेचले. तसेच अनेकांनी प्राण पणाला लावले. आजही बाळासाहेबांची पुण्याई संपलेली नाही. त्यांनी दिलेले विचार संपलेले नाहीत. त्यांनी दिलेला हिंदुत्वाचा विचार, मराठी माणसाला दिलेला आधार आहे. शिवसेना ही राख साचलेल्या निखाऱ्यासारखी झाली आहे. राख बाजूला केली की, पुन्हा एकदा निखारा पेटता होईल. बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक पेटत्या निखाऱ्यासारखा आहे, असे भास्कर जाधव यांनी म्हटले आहे.
दरम्यान, कोकणात नव्या दमाची तरुणांची फळी उभी करण्याची गरज असल्याचे सांगत उदय सामंत हल्ली माझ्याबद्दल चांगले बोलत आहेत. त्यांनी कायम चांगले बोलावे, असा खोचक टोला भास्कर जाधव यांनी लगावला. ते एबीपी माझाशी बोलत होते.