संगमेश्वर:- कोकणात अनेक ठिकाणी लहान कैरीसुद्धा दिसत नाही; परंतु संगमेश्वर तालुक्यातील फुणगूस खाडीपट्ट्यातील परचुरी येथील बागायतदार शरद गोणबरे, विपुल गोणबरे यांनी आपल्या बागेतील तयार हापूस आंब्यांची चार डझनांची पेटी पुणे येथे लक्ष्मीनारायण यांच्याकडे पाठवली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातून गतवर्षी फेब्रुवारी महिन्यात हापूसच्या पेट्या मोठ्या प्रमाणात मुंबई बाजारात रवाना झालेल्या होत्या; मात्र यावर्षी चार ते पाच बागायतदारांनी हापूस बाजारात पाठवण्याचा मुहूर्त साधला आहे. तेही पावस, चांदेराई, रिळ येथून काही पेट्या मुंबई आणि पुणे बाजारात विक्रीसाठी गेल्या होत्या. देवगड येथून हापूस आंब्याची आवक सुरू आहे. सप्टेंबर महिन्यात पडलेल्या उन्हामुळे कलमांना ताण बसला होता. त्यामुळे अनेक ठिकाणी झाडे मोहोरली होती. त्यावर औषध फवारणी करून बागायतदारांनी उत्पादन घेतले. त्यामुळे पहिल्या टप्प्यात काही मोजक्याच आंबापेट्या पाठवणे शक्य झाले. त्यामध्ये नदीकिनारी असलेल्या फुणगूस परिसरातील आंबा कलमे ही उशिराने लागतात. तरीही यंदा फुणगूस येथून आंबापेट्या पाठवण्यात यश आले. पहिली पेटी पाठवण्याचा गोणबरे बंधू यांनी १३ रोजी मुहूर्त केला आहे. काही दिवसात त्यांच्याकडील हापूस आंबा तयार होऊन मुंबई व पुणे येथे पाठवण्यास अशीच सुरवात झाली आहे.
कष्ट केले तर आंब्याला चांगला दर
हापूस आंबा कलमांची योग्य काळजी घेणे, खत घालणे, साफसफाईसाठी कष्ट करणे, शेतीपूरक व्यवसाय करणे व नशिबाने हवामानाने साथ देणे या गोष्टी महत्वाच्या असतात. त्या प्रकारे कष्ट केले तर नक्कीच आंब्याला चांगला दर येऊन शेतकरीवर्गाला लाभ होऊ शकतो, हा संदेश गोणबरे यांनी पहिली आंबापेटी पाठवून अन्य बागायतदारांना दिला आहे.