लांजा : अपघात झाल्यानंतर दरीत कोसळलेल्या मोटारसायकल चालकाला लांजा येथील प्रसाद भाईशेट्ये यांनी वेळीच मदत करत उपचार मिळवून दिले. त्यामुळे दुचाकी चालकाचे प्राण वाचले. ही घटना मुंबई-गोवा महामार्गावर आंजणारी घाटात घडली. प्रसंगावधान राखून अपघातग्रस्त मोटारसायकल चालकाला मदत केल्याबद्दल पोलिस ठाण्याकडून प्रसाद यांचा सत्कार करण्यात आला.
लांजा शहरातील ठेकेदार शिवसेनेचे पदाधिकारी प्रसाद भाईशेट्ये हे तीन दिवसांपूर्वी रत्नागिरीहून लांजाकडे रात्री गाडीने येत होते. मठ गाव सोडल्यानंतर आंजणारीच्या उतारात असताना महामार्गावर एक मोटारसायकल पडलेली आढळली. मोटारसायकलची अवस्था पाहता तिथे अपघात झाल्याची शक्यता भाईशेट्ये यांच्या लक्षात आली.
त्यांनी गाडी थांबवली आणि आजूबाजूला पाहिले; मात्र काळोख असल्यामुळे कोणी आढळले नाही; मात्र मोटारसायकल पडलेली असल्याने कोणीतरी नक्कीच जखमी झाला असण्याची शक्यता होती. प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी बॅटरीच्या उजेडात या अपघातग्रस्त मोटरसायकल चालकाचा शोध घेतला.
अपघातग्रस्त चालक महामार्गाच्या कडेला दरीत पडलेला दिसला. याबाबतची माहिती भाईशेट्ये आणि तत्काळ लांजा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नीळकंठ बगळे यांना दिली. बगळे यांनी भाईशेट्ये यांना संबंधित व्यक्तीला तातडीने उपचारासाठी दाखल करण्याची सूचना केली.
त्यानुसार भाईशेट्ये यांनी मठ येथील कांबळे यांच्या रिक्षाने अपघातग्रस्त मोटरसायकल चालकाला पाली येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. भाईशेट्ये यांच्या प्रसंगावधानामुळे त्या दुचाकी चालकाला वेळीच उपचार मिळाल्याने त्याचे प्राण वाचले. याबद्दल भाईशेट्ये यांचे कौतुक करण्यात आले.
दरीत कोसळलेल्या दुचाकीस्वाराला वाचवणाऱ्या लांजातील तरुणाचा पोलिसांतर्फे सत्कार
