चिपळूण (प्रतिनिधी) : पत्रकार संदेश पवार यांच्या पुरोगामी महाराष्ट्र उजव्या वळणावर या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच महाड येथे ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी, दलित पॅंथरचे सहसंस्थापक ज.वी. पवार, ज्येष्ठ संपादक प्रा. आनंद देवडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. अपरान्त साहित्य कला प्रबोधिनीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तिसऱ्या सम्यक साहित्य कला संगीतीमध्ये पत्रकार संदेश पवार यांच्या नव्या लेखसंग्रहाचे अर्थात पुरोगामी महाराष्ट्र उजव्या वळणावर या आगळ्या वेगळ्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी विचार मंचावर प्रबोधिनीचे सरचिटणीस सुनील हेतकर, लेखक व पत्रकार संदेश पवार, कोषाध्यक्ष दीपक पवार, डॉ. श्रीधर पवार, प्रा.डॉ. संजय खैरे , शाहीर मारुती सकपाळ, अभिनेते अशोक चाफे, अभिनेते निलेश पवार, विश्वास पवार , मिलिंद टिपणीस ,डॉ. राजेंद्र मुंबरकर, संजय गमरे, भावेश लोखंडे धम्मकिरण चेन्ने आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना ज. वि. पवार यांनी पत्रकार संदेश पवार यांचे हे नवे पुस्तक महत्त्वाचे असून समकालीन सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक परिस्थितीचा आढावा घेणारे आहे. पुरोगामी असणारा महाराष्ट्र कसा बदलत चालला आहे, उजव्या वाटेने कसा जात आहे याचे विश्लेषण सुंदर प्रकारे केले आहे. त्यामुळे आगामी काळात समाजाची वाटचाल ही संविधानिक मार्गाने, संविधानिक मूल्यांनी होण्याची नितांत आवश्यकता आहे, अशी भूमिका पुस्तकातून दिसून येत आहे. ती खरेच आवश्यक आहे ,असे सांगितले. तर नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी देखील या पुस्तकाचे स्वागत केले. हे पुस्तक महत्त्वाचे असल्याचे नमूद केले. या पुस्तकाबद्दल अनेक मान्यवरांनी गौरव उद्गार काढले आहेत. वैचारिक श्रेणीतील हे पुस्तक महत्त्वाचे आहे अशा प्रतिक्रिया अनेक लेखक साहित्यिकांनी व्यक्त केले.