रत्नागिरी:-येथील नाचणे रोडवरील पॉवर हाऊसजवळील श्री गजानन महाराज मंदिराच्या आवारात नवग्रह मंदिर नव्याने बांधण्यात आले असून येत्या शनिवारी, दि. १५ ते १७ फेब्रुवारी या कालावधीत नवग्रह नवकुंडी प्राणप्रतिष्ठा सोहळा तसेच १८ ते २० फेब्रुवारी या कालावधीत श्री गजानन महाराज मंदिरात प्रकटदिन सोहळा आयोजित करण्यात आल्याची माहिती श्री गजानन महाराज (शेगांव) स्मृतीमंदिर समितीचे संस्थापक अध्यक्ष म.वा. देसाई यांनी दिली.
नाचणे येथील श्री गजानन महाराज मंदिरात आज आयोजित पत्रकार परिषदेचे बोलत होते. यावेळी प्रवीण ऊर्फ अण्णा कवितके उपस्थित होते. माहिती देताना श्री. देसाई म्हणाले, नवग्रह नवकुंडी प्राणप्रतिष्ठा सोहळा तसेच गजानन महाराज प्रकट दिन सोहळा या निमित्ताने १५ ते २० फेब्रुवारी या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, त्याची सुरुवात १५ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता समितीतील महिलांच्या हस्ते नवग्रहांवर जलस्नानाच्या मोठ्या कार्यक्रमाने होणार आहे.
नवग्रह नवकुंडी प्राणप्रतिष्ठा सोहळा तसेच श्री गजानन महाराज प्रकट दिन सोहळ्या निमित्त आयोजित विविध धार्मिक कार्यक्रमांना भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री. देसाई यांनी केले आहे.