रत्नागिरी:-येथे पार पडलेल्या क्षेत्रीय वैदिक संमेलनात सहभागी झालेल्या ५१ वैदिकांनी नागचाफा लागवडीचा वसा घेतला आहे.
महर्षी सांदीपनी राष्ट्रीय वेदविद्या प्रतिष्ठान (उज्जैन) आणि कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय (रामटेक) संस्थेचे रत्नागिरीतील भारतरत्न डॉ पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र रत्नागिरी उपकेंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने क्षेत्रीय वैदिक संमेलन पार पडले.
संमेलनाच्या सांगता समारंभाच्या वेळी संगमेश्वर येथील मधुरांगण फाउंडेशनतर्फे कैलास नागचाफा रोपे निःशुल्क वितरित करण्यात आली. विश्वविद्यालयाचे कुलगुरू प्रो. हरेराम त्रिपाठी स्वतः नागचाफ्याचे रोप विश्वविद्यालयाच्या आवारात लावणार आहेत.
आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक या ४ राज्यांतील विविध भागातून वेदपाठशाळेतील अध्यापक, मंदिर पुजारी, वैदिक क्षेत्रातील अभ्यासक या संमेलनासाठी आलेले होते. मधुरांगण फाउंडेशनने खास वैदिक मान्यवरांकरिता निःशुल्क नागचाफा रोप वितरण आयोजित केले. त्यापैकी ५१ जणांना कैलास नागचाफा औषधी वनस्पतीचे वितरण करण्यात आले. कोकणातील दुर्मिळ अशी ही बहुगुणी औषधी वनस्पती अनेकविध आजारांवर उपयुक्त ठरते. उच्च रक्तदाब, कफ विकार, त्वचा विकार व सौंदर्यप्रसाधनात नागचाफ्याच्या विविध भागांचा वापर केला जातो.
या बहुगुणी कैलास नागचाफा पवित्र वृक्षाचे वितरण मधुरांगण फाउंडेशन संस्थेच्या उपाध्यक्षा वैदही किरवे यांच्या हस्ते करण्यात आले. या रोपांचे वितरण केल्यामुळे कैलास नागचाफा आणि त्याचे महत्त्व रत्नागिरीतील गावांमध्ये व उज्जैन, परळी वैजनाथ, मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, हैदराबाद, विविध वेदपाठ शाळा अशा देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहे.कार्यक्रमाला कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे यांचे विशेष सहकार्य लाभले. मधुरांगण फाउंडेशन संस्थेच्या उपाध्यक्षा वैदेही किरवे, ओंकार किरवे व श्री. नाचणकर आदी यावेळी उपस्थित होते.