ग्रामपंचायतीचे प्रांताधिकाऱ्याना निवेदन
चिपळूण:-कोळकेवाडीतील पश्चिम हसरेवाडीच्या पायथ्याशी ग्रॅव्हिटी पाणीयोजनेच्या जलश्द्धीकरण प्रकल्पाचे काम सुरू आहे. या प्रकल्पासाठी मोठया प्रमाणात खोदाई झाल्याने पावसाळ्यात या दरडग्रस्त वाडीला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या वाडीच्या पुनर्वसनाची जबाबदारी जोवर निश्चित होत नाही, तोवर प्रकल्पाचे काम थांबवण्यात यावे, अशी मागणी कोळकेवाडी ग्रामपंचायतीच्यावतीने प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या निवेदनात म्हटले आहे, कोळकेवाडी धरणाच्या उभारणीनंतर धरणाच्या उजव्या व डाव्या काठावर या वाडयाचे पुनर्वसन झाले. येथील शेतकऱ्याच्या जमिनी संपादित झाल्या तरी त्यांना शासकीय जमिनी मिळाल्या नाहीत. येथील बहुतांश ग्रामस्थ अल्पभूधारक आहेत. 2021मध्ये संपूर्ण कोळकेवाडी गावात भूस्खलन झाले व वाडया-वाडयामध्ये घराखालील जमिनींना भेगा पडल्या.
भूगर्भशास्त्रज्ञांनी पाहणी केली असता बोलाडवाडी, बौद्धवाडी, तांबडवाडी, पूर्व हसरेवाडी व पश्चिम हसरेवाडी या वाडयाना डोंगर सरकून जमिनी खचण्याचा धोका असल्याचा अहवाल दिला. या भागात खोदकाम करू नये, अशा सूचनाही केल्या आहेत. दर पावसाळ्यात या वाडीतील ग्रामस्थांना स्थलांतरित होण्याच्या नोटीसा प्रशासनाकडून दिल्या जातात. त्यामुळे ऐन पावसाळ्यात येथील ग्रामस्थांची ससेहोलपट होते. त्यामुळे शासनाच्या अलोरे येथील रिक्त जागेवर पुनर्वसन करण्यात यावे, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. परंतु त्याला प्रतिसाद मिळत नाही.
जलजीवन मिशन अंतर्गत अडरे अनारी परिसरातील 22 गावांच्या नळपाणीपुरवठा योजनेची जलशुद्धीकरण टाक्यांची उभारणी अलोरे येथे करण्यात येणार आहे. त्यांचे खोदकाम मोठया प्रमाणावर सुरू आहे. ही जागा पश्चिम हसरेवाडी या पायथ्याशी आहे. येथील ग्रामस्थांना जमिनी खचण्याची भीती वाटत आहे. त्यामुळे येथील घरांना धोका निर्माण झाला आहे. कोणत्याही पाणी योजनेला आमचा विरोध नाही. ग्रामस्थांच्या जीवितांची व घरांची जबाबदारी कोण घेणार? दुर्घटना घडल्यानंतर मदत करण्यापेक्षा, दुर्घटना घडू नये, यासाठी खबरदारी घेणे महत्वाचे आहे. येथील ग्रामस्थांच्या भावना तीव्र आहेत. त्यामुळे या वाडीच्या भवितव्याची जबाबदारी निश्चित करेपर्यंत येथील उत्खनन थांबवण्यात यावे. या प्रश्नांवर योग्य तो मार्ग काढण्यात यावा, अशी मागणी कोळकेवाडी ग्रामपंचायतीने केली आहे.