चिपळूण:-आगवे ते सावर्डे मार्गावर दुचाकीवरुन पत्नी पडून तिचा मृत्यू झाल्याची घटना जानेवारी महिन्यात घडली होती. या प्रकरणी पतीवर सावर्डे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रवींद्र यशवंत भुवड (आगवे) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. अपघातात शर्मिला रवींद्र भुवड (41, आगवे) यांचा मृत्यू झाला. या बाबतची फिर्याद प्रदीप अर्जून गमरे यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवींद्र व त्याची पत्नी शर्मिला तसेच मुलगी निधी (14) असे 11 जानेवारी रोजी दुचाकीवरुन आगवे ते सावर्डे रेल्वेस्टेशन येथे सर्व्हिस रोडने जात होते. यावेळी दुचाकीच्या मागे बसलेल्या शर्मिला दुचाकीवरुन खाली पडल्या. यावेळी त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. यातच त्यांचा मृत्यू झाला. या अपघातप्रकरणी रवींद्र भुवड यांच्यावर मंगळवारी सावर्डे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.