रत्नागिरी : खेडमधील वकिलाला लाचलुचपत विभागाने पकडल्याची घटना काही दिवसापूर्वी घडली होती. त्यांनतर रत्नागिरी मांडवी येथे सोमवारी रात्री 11.30 वाजता वकिलाला मारहाण झाल्याची घटना समोर आली. हे प्रकरण ताजे असतानाच वकीलाबाबत तिसरी घटना समोर आली आहे. रत्नागिरीतील महिला वकिलाचा पाठलाग करुन तिला त्रास देणाऱ्या वकिलाविरुद्ध शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आल़ा आहे. नृपेन सिद्धार्थ कांबळे (36, रा.देवधे, ता.लांजा) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या वकिलाचे नाव आहे.
महिला वकिलाच्या तक्रारीनुसार नृपेन हा मागील महिन्याभरापासून त्रास देत होता. तो सातत्याने पाठलाग करुन ‘तुझ्याशी बोलायचे आहे, दोन मिनिटे बोल, अशी विनंती करत होता, मात्र आपल्याला काहीही बोलायचे नाही, असे महिला वकिलाकडून स्पष्ट करण्यात आले होते. नृपेन याचा त्रास वाढत चालल्याने महिला वकिलाने या संबधी रत्नागिरी शहर पोलिसांत तक्रार दाखल केली होती. यावेळी पोलिसांकडून नृपेनला समज देण्यात आली होती, तसेच त्याच्या पालकांनी यापुढे असा प्रकार होणार नाही, अशी हमीही दिली होती. पोलिसांकडून समज देवूनही 10 फेबुवारी रोजी नृपेन याने तक्रारदार यांचा पुन्हा एकदा पाठलाग केला. तसेच दोन मिनिटे बोलायचे आहे, माझे म्हणणे ऐकून घे, अशी विनवणी करु लागल़ा तसेच एकदा लग्नाचे काय ते सांग असे बोलू लागला. दरम्यान नृपेनच्या त्रासाला कंटाळून महिला वकिलाने रत्नागिरी शहर पोलिसात पुन्हा एकदा तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी नृपेनविरुद्ध भारतीय न्याय संहिता 78 (2) व 351 (2) नुसार गुन्हा दाखल केला.