चिपळूण:-गेल्या महिन्यात टेरव येथील जंगलातील कोळसा भट्टया उद्ध्वस्त करत कोळसा व्यापाराचा पुरता बिमोड केल्यानंतर वनविभागाने मंगळवारी रात्री कळवंडे-माडवाडी येथील डोंगरात लावण्यात आलेल्या तब्बल 12 कोळसा भट्टयावर कारवाई करत त्या उद्ध्वस्त केल्या. त्यामुळे परिपूर्ण असलेल्या आठ भट्टया पेटवून दिल्या, तर चार भट्टयासाठी राहिलेले लाकूड जप्त करण्यात आले आहे.
टेरव येथील भट्टया थंडावलेल्या असताना आता नव्याने कळवंडे गावात भट्टया लावल्या जात असल्याचे मंगळवारी रात्री करण्यात आलेल्या वनविभागाच्या कारवाईवरून स्पष्ट झाले आहे.
कळवंडे माडवाडी येथील डोंगरात असलेल्या भातशेतामध्ये कोळसा भट्टया लावल्या जात असल्याची गुप्त माहिती वनविभागाला मिळाल्यानंतर विभागीय वनाधिकारी गिरिजा देसाई, सहाय्यक वनसंरक्षक प्रियांका लगड, परीक्षेत्र वनाधिकारी सरवर खान यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल एस. एस. सावंत, वनरक्षक राहूल गुंठे, आर. आर. शिंदे, चालक नंदू कदम, सुरक्षा रक्षक संजय आंबवकर आदींच्या पथकाने मंगळवारी सायंकाळी कळंवडे येथे जाऊन पाहणी केली असता कोळशासाठी आठ भट्टया लावण्यात आलेल्या होत्या. तर चार भट्टयासाठी केवळ लाकडे रचूनन ठेवण्यात आली होती. यावेळी गावचे पोलीस पाटील अनंत उदेग यांनाही सोबत घेण्यात आले. प्रथम त्यातील 8 भट्टया पेटवून देण्यात आल्या. तर चार भट्टयांचे लाकडे म्हणून जळावू लाकूड साधारणपणे 6 घनमीटर इतका जप्त करण्यात आला आहे.