चिपळूण:- मध्यवर्ती बसस्थानकाचे बांधकाम अर्धवट स्थितीत आहे. प्रवाशांना गाडीची उन्हातच प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे सुस्थितीतील स्लॅबवर पत्रे टाकून प्रवाशांची सोय करावी; अन्यथा 1 मार्च रोजी आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा कष्टकरी-शेतकरी संघटनेचे अशोकराव जाधव यांनी दिला आहे.
या संदर्भात दि. 6 फेब्रुवारी रोजी जाधव यांनी एस.टी. प्रशासनाला निवेदन दिले होते. त्यावर दोन दिवसांत कार्यवाही करण्याचे आश्वासन जाधव आणि शेतकरी-कष्टकरी संघटनेच्या शिष्टमंडळाला देण्यात आले. या संदर्भात दि. 11 रोजी अशोकराव जाधव, तसेच शिष्टमंडळाने अल्पेश मोरे, शिवाजी पवार, राजेशजी मुल्ला, बशिर बेबल, समीर रेडीज, आशिष कुंभार इत्यादी प्रत्यक्ष डेपो मॅनेजर चव्हाण यांच्यासमवेत पाहणी केली. मात्र, काहीच कार्यवाही झाली नसल्याचे निदर्शनास आले.
याबाबत जाधव यांनी सांगितले की, सध्या उन्हाची तीव्रता वाढली आहे. त्यामुळ वृद्ध, स्त्रिाया, लहान मुले यांना बसची वाट पाहात उन्हात उभे राहावे लागत आहे. काही दिवसांनी कोकणातील महत्त्वाचा असणार्या शिमगोत्सवाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे मध्यवर्ती बसस्थानकात प्रवाशांची वर्दळ वाढणार आहे. त्यामुळे सुस्थितीतील स्लॅबवर पत्रे टाकून त्या ठिकाणी प्रवाशांची तात्पुरती सावलीची व्यवस्था करण्यात यावी. या बाबत तातडीने कार्यवाही न झाल्यास काँग्रेस आणि शेतकरी कष्टकरी संघटनेच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल. तसेच महामंडळाच्या कार्यकारी अभियंता, चीफ इंजिनिअर यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करणार असल्याचा इशाराही जाधव यांनी यावेळी दिला.