रत्नागिरी : एखादे पार्सल किंवा जेवणाचा डबा अथवा औषध कुणा नातेवाईकाला पाठवून द्यायचे असेल तर त्या भागातून जाणाऱ्या एसटीचा चालक वा वाहकाकडे अनेक जण देतात. कर्मचारीही माणुसकीच्या नात्याने ने-आण करीत असतात. आता असे केल्यास एसटी कर्मचारी कारवाईस पात्र ठरतील.
एसटीतील कर्मचाऱ्यांवर प्रवाशांचा खूप विश्वास आहे. त्यांच्याकडे दिलेली वस्तू हमखास आपण सांगितलेल्या व्यक्तीकडे सुरक्षितपणे जाते, अशी खात्री देणाऱ्याला असते. पण, सध्या नव्या नियमामुळे हे शक्य होणार नाही. एसटी प्रशासनाकडून पार्सल, वस्तूची ने-आण करण्यासाठी परिवहन खात्याने एका खासगी कंपनीला टेंडर दिले आहे. यामुळे कोणाला एखादी वस्तू द्यायची असेल तर त्यांनी या कंपनीमार्फतच द्यावी. कर्मचारी पार्सल नेताना आढळल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होईल, असे आदेशही परिवहन महामंडळाकडून काढण्यात आले आहेत. बसस्थानकावर पार्सल कार्यालय सुरू आहे. येथून जी पार्सल मिळतात, ती वाहकांनी काळजीपूर्वक न्यावी, असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे