टीव्ही, शिलाई मशीन, फ्रीज, आटा चक्की, वॉशिंग मशीन, मोबाइल सारख्या बक्षिसाचे आमिष दाखवत स्क्रॅच कुपनद्वारे हजारोंची फसवणूक
लांजा:-एका टोळक्याने स्क्रॅच कुपनवर मोठ्या बक्षिसाचे आमिष दाखवत लांजा तालुक्यातील ग्रामीण भागातील सर्वसामान्यांना हजारो रुपयांना फसवल्याचा प्रकार समोर येत आहे. दोन दिवसांपूर्वी लांजा तालुक्यातील अनेकांना या टोळक्याने गंडा घातल्याचे समोर आले आहे.
या कुपनवर शुभांगी एंटरप्राईजेस, राजारामपुरी, ८ वी गल्ली, कोल्हापूर असा उल्लेख आहे. मात्र, दूरध्वनी क्रमांक किंवा रजिस्ट्रेशन नंबर त्यावर नाही. त्यामुळे या पावत्या खोट्या छापून घेण्यात आल्या असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या स्क्रॅच कुपनची किंमत शंभर रुपये असल्याचे समजले.
या टोळक्यामध्ये महिलेचाही समावेश असल्याचे अनेकांच्या निदर्शनास आले असून टोळक्यातील महिला गप्पा मारता मारता आपण एका कंपनीचे काम करत असून बक्षिसांचे आमिष दाखवत शंभर रुपयांचे कुपन घेण्यास सुचवते. जर कोणी सहज कुपन घेतले तर त्याला अजून कुपन घेण्याच्या मोहात पाडले जाते.
प्रत्येक कुपनवर काही ना काही लागतेच असे सांगून मोठी इलेक्ट्रिक वस्तू ज्या कुपनवर आहे त्याचा ॲडव्हान्स ही महिला घेते. तुमची वस्तू आमच्या गाडीतून घेऊन येते, तोपर्यंत तुम्ही फोटो काढण्यासाठी तयारीत करा असे सांगून तिथून निघून जाते.
या कुपनवर २२ इंची एलईडी टीव्ही, शिलाई मशीन, फ्रीज, आटा चक्की, वॉशिंग मशीन, मोबाइल, मिक्सर व इस्त्री, ग्लास टॉप शेगडी अशा जवळपास १६ इलेक्ट्रिक वस्तूंचा समावेश आहे. यातील जी वस्तू कुपन स्क्रॅच केल्यावर लागेल ती अर्ध्या किंमतीत घरपोच मिळण्याचे आमिष दाखवण्यात येते. तालुक्यातील काही ग्रामस्थ या फसवणुकीला बळी पडले आहेत. यातील काही जणांनी पोलीस स्थानकात धाव घेतली आहे.
दरम्यान, याच कालावधीत राजापूर शहरासह तालुक्यात देखील असाच प्रकार घडल्याची माहिती उघडीस आली आहे. लांजा आणि राजापूर तालुक्यात संबंधित टोळक्याने एकाच दिवशी ही फसवणूक केल्याचे समजताच एकच खळबळ उडाली आहे.