चिपळूण : तालुक्यातील चिवेली राष्ट्रीय पेयजल योजनेतील अपहारप्रकरणी दोषींवर फौजदारी कारवाई करावी, अशी तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते विद्याधर साळुंखे यांनी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, विभागीय आयुक्त कार्यालकडे केली आहे. याचा प्रशासकीय अहवाल चौकशी करून द्या, अन्यथा आपल्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असा इशारा विस्तार अधिकाऱ्यांना गटविकास अधिकारी यांनी दिला आहे.
चिवेली राष्ट्रीय पेयजल योजनेतील अपहार प्रकरणी चिपळूण पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना प्रशासकीय बाबींचा अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, याबाबत तक्रारदारांनी संबंधित
प्रशासनाला चार स्मरणपत्रे दिली आहेत. मात्र, अजूनही तो अहवाल देण्यात आलेला नाही याची गंभीर दखल घेतली आहे. गेल्या काही दिवसांपासून याबाबतचा अहवाल देण्यात जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप साळुंखे यांनी केला आहे. आता या प्रकरणाची गंभीर दखल घेत या प्रकरणात आता एकमेकांवर जबाबदारी टाकण्याचा प्रकार सुरू झाला आहे. विद्याधर साळुंखे यांनी चिवेली राष्ट्रीय पेयजल योजनेचा विषय जोरदारपणे लावून धरला आहे. त्याची रितसर तक्रार जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी, विभागीय आयुक्त कार्यालयाकडे केली आहे.
या तक्रारीनुसार जिल्ह्या परिषद प्रशासनाने गटविकास अधिकारी उमा घारगे पाटील यांना पत्र पाठविले आहे. तक्रारीच्या अनुषंगाने सदर कालावधीमधील प्रशासकीय बाबी (आर्थिक व्यवहार) तसेच तांत्रिक बाबीसंबंधी प्रामपंचायत स्तरावरील कर्मचारी तसेच सरपंच व तांत्रिक बाबीसंबंधी जिल्हा परिषद उपविभाग (ग्रा.पा.पु.) अधिकारी व कर्मचारी यांची माहिती आपल्या अभिप्रायासह सादर करावी, तक्रारीच्या अनुषंगाने तांत्रिक चौकशी अहवाल प्राप्त झाला आहे; परंतु प्रशासकीय बाबींचा अभिप्राय आवश्यक असल्याने तक्रारीच्या अनुषंगाने प्रशासकीय अभिप्राय सादर न झाल्यामुळे पुढील कार्यवाही करण्यास विलंब झाला आहे. तक्रारदारांनी विभागीय आयुक्त कार्यालयाकडे तक्रार केलेल्या अर्जाची प्रत या कार्यालयाकडे प्राप्त झाली आहे. याबाबत विलंबाची सर्वस्वी जबाबदारी आपल्या कार्यालयाची राहील, असेही बजावण्यात आले आहे. या पत्राची दखल घेत अखेर गटविकास अधिकारी यांनी ग्रामपंचायत विभागाचे विस्तार अधिकारी डी. वाय. कांबळे यांना लेखी पत्र दिले आहे. शासनाचे कक्ष अधिकारी प्रवीणकुमार पवार यांनी याबाबत तत्काळ अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
तक्रारदारांकडून चार स्मरणपत्रे
चिवेली राष्ट्रीय पेयजल योजनेतील अपहारप्रकरणी चिपळूण पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना प्रशासकीय बाबीचा अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याबाबत तक्रारदारांनी संबंधित प्रशासनाला चार स्मरणपत्रे दिली आहेत.