रत्नागिरी : नाणीज येथील जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानाने शिरसाड (जि. पालघर) येथे बेरोजगार युवकांसाठी पूर्णपणे मोफत मोटर ड्रायव्हिंग स्कूल सुरू केले असून आतापर्यंत ६५० तरुणांना वाहनचालन प्रशिक्षण दिले आहे.
बेरोजगार युवकांना स्वयंपूर्ण बनवण्याच्या उदात्त हेतूने २०१४ पासून हे मोटार ड्रायव्हिंग स्कूल सुरू आहे. दहा वर्षांत ६५० पेक्षा अधिक तरुणांनी तेथे प्रशिक्षण घेतले असून ते आता आपला स्वतःचा व्यवसाय करत आहेत. पूर्णपणे विनामूल्य असलेल्या या मोटर ड्रायव्हिंग स्कूलमध्ये युवकांच्या भोजनाची तसेच निवासाचीही मोफत सोय संस्थानाच्या वतीने केली जाते. उत्तम प्रशिक्षकांमार्फत प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर या युवकांना वाहन परवानादेखील संस्थानाकडूनच काढून दिला जातो. त्यामुळे पालघर जिल्ह्याच्या आदिवासीबहुल भागातील बेरोजगार युवकांना स्वयंपूर्ण होण्यासाठी मोलाचे सहकार्य मिळत आहे.