रत्नागिरी : रत्नागिरीजवळील कारवांची वाडी येथील दिव्यांग भारती भायजे यांना आरएचपी फाउंडेशनच्या पुढाकाराने यांत्रिक व्हीलचेअर मिळाली.
भारती गणपत भायजे पाच वर्षांची असताना ताप येऊन दोन्ही पायांना पोलिओ झाला.
त्यामुळे कमरेपासून खाली संवेदना कमी झाल्या. सुरुवातीला गुडघ्यावर बसून हात टेकवून चालायची. याही स्थितीत तिने नववीपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर चालणे अशक्य झाल्याने शिक्षण थांबवावे लागले. गेल्या १० वर्षांपासून त्या व्हीलचेअर वापरतात. सुरुवातीला कोल्हापूरच्या एका संस्थेकडून व्हीलचेअर मिळाली होती. ती खराब झाल्यानंतर रत्नागिरीतील एक शिबिरामधे दुसरी व्हीलचेअर मिळाली होती, पण ती सोयीची नव्हती. चालवायला खूप जड जायची. हात दुखायचे. भारती सध्या टेलरिंगचे काम करतात. आधी घरीच कपडे शिवायच्या. आता कारवांचीवाडी येथे एक गाळा भाड्याने घेऊन तेथे टेलरिंग व्यवसाय करतात. घरातून व्हीलचेअर सोयीची नसल्याने येण्याजाण्याचा खूप त्रास होत होता.
एका शिबिरामध्ये भारती यांना आरएचपी फाउंडेशनची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष संस्थेत जाऊन अध्यक्ष सादीक नाकाडे यांची भेट घेतली आणि अडचण सांगितली. सादिक नाकाडे यांनी आरएचपी फाउंडेशनतर्फे भारती यांचे नाव निओमोशनसाठी फ्रेण्ड्स फाउंडेशनला सुचविले. इम्पॅक्ट गुरु फाउंडेशन आणि निओमोशन यांनी भारती यांचे चेकअप करून त्यांची निवड निओमोशनसाठी केली. वसई येथील हॉटेल रॉयल हिल्स येथे सात दिवसांचे निवासी प्रशिक्षण देऊन निओमोशन वितरित करण्यात आली. या गाडीविषयीची सर्व माहितीही शिबिरात देण्यात आली.नव्या व्हीलचेअरमुळे भारती यांना आता कोणाच्याही मदतीशिवाय बाहेर जाऊन काम करता येणार आहे. अर्थार्जनासाठीही निओमोशनचा त्यांना खूप उपयोग होणार आहे. निओमोशन ट्रेनिंगला जाण्यासाठी संदीप धुमाळे यांनी त्यांना मदत केली. आरएचपी फाउंडेशनचे अध्यक्ष सादिक नाकाडे, सदस्य समीर नाकाडे यांचे भारती व त्यांच्या पालकांनी आभार मानले.