चिपळूण ः सरकारी शाळांमध्ये दहा किंवा दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत डीएड्, बीएड्धारक उमेदवारांना कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती करण्यासंदर्भातला शासननिर्णय रद्द करण्यात आला आहे.
त्यामुळे चिपळूण तालुक्यातील १२० कंत्राटी शिक्षकांची नेमणूक रद्द होण्याच्या मार्गावर आहे. दुसऱ्या टप्प्यातील शिक्षकभरती सुरू होत असल्यामुळे नियमित शिक्षक मिळण्याची शक्यता आहे.
चिपळूण तालुक्यात एकूण ३१६ शाळा आहेत. यामध्ये सुमारे नऊ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सरकारी शाळा जिथे १० किंवा १० पेक्षा कमी पटसंख्या होती त्या शाळांमध्ये बीएड् आणि डीएड्धारक बेरोजगार उमेदवारांना कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती देण्यास मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार १२० शाळांवर कंत्राटी शिक्षक नेमण्यात आले आहेत. सप्टेंबर २०२४ मध्ये शासननिर्णय काढण्यात आला होता. खरंतर, नियमित शिक्षकांच्या नियुक्तीपर्यंत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यामुळे तात्पुरती व्यवस्था म्हणून सरकारने हा शासननिर्णय जाहीर केला होता; मात्र आता २०२२ च्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमधील गुणांच्या आधारे करण्यात येणाऱ्या शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा पूर्ण होत आहे. त्यामुळे आता पात्र शिक्षक नियमित तत्त्वावर उपलब्ध होणार आहेत. याच कारणामुळे २०२४ च्या शासननिर्णयानुसार कंत्राटी तत्त्वावर घेण्यात आलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीचा कार्यकाळ हा नियमित शिक्षक नियुक्तीपर्यंत असेल, असा नवा शासननिर्णय जारी करण्यात आला आहे.