तर कोकण विभागात एकही कॉपीचे प्रकरण नाही
पुणे : पालक व विद्यार्थ्यांची परीक्षेला वेळेत पोहोचण्यासाठी चाललेली घाईगडबड … पालकांच्या दुचाकीवर पाठीमागे बसून शेवटच्या क्षणीही मुला -मुलींची वही हातात घेऊन वाचण्यासाठीची धडपड…
प्रवेशपत्र घेतले ना? अशी पालकांची सातत्याने होणारी विचारणा… परीक्षेची धाकधूक ..अभ्यास तर केलाय पण पेपर सोपा असेल की अवघड अशी विद्यार्थ्यांच्या मनात चाललेली चलबिचल… असे काहीसे चित्र शहरातील बारावीच्या विविध परीक्षा केंद्रावर पाहायला मिळाले. दरम्यान, मंगळवारी ( दि. ११) राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने घेण्यात येणा-या बारावी परीक्षेच्या सकाळच्या सत्रातील इंग्रजी विषयाच्या पहिल्याच पेपरला राज्यभरात ४२ कॉपीची प्रकरणे आढळली असल्याचे मंडळाने सांगितले.
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) परीक्षेस मंगळवारी ( दि. ११) सुरुवात झाली. गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही परीक्षेला निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटे वेळ वाढवून देण्यात आली. संपूर्ण राज्यात बारावीच्या परीक्षेसाठी एकूण १५ लाख ५ हजार ०३७ इतक्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, त्यामध्ये ८ लाख १० हजार ३४८ मुले आणि ६ लाख ९४ हजार ६५२ मुली व ३७ तृतीयपंथींचा समावेश आहे. राज्यात १० हजार ५५० कनिष्ठ महाविद्यालयांमधून विद्यार्थ्याची नोंदणी झालेली असून, या परीक्षेसाठी संपूर्ण राज्यात विद्यार्थ्यांसाठी ३ हजार ३७३ मुख्य केंद्रावर परीक्षा आयोजित करण्यात आली आहे.
कॉपी मुक्त अभियान राबवूनही बारावी परीक्षेत ४२ कॉपी प्रकरणे
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने कॉपीमुक्त अभियान हाती घेण्यात आले आहे. परीक्षेपूर्वी मंडळाने कॉपी मुक्त अभियानाअंतर्गत जनजागृती सप्ताह देखील राबविण्यात आला. असे असतानाही बारावी परीक्षेत नऊ विभागांमध्ये एकूण ४२ कॉपीची प्रकरणे समोर आली असून, सर्वाधिक प्रकरणे छत्रपती संभाजीनगर विभागात आढळली आहेत. याशिवाय पुणे ८, अमरावती २, नाशिक ३, लातूर १ यात कॉपीची प्रकरणे आढळली आहेत. तर मुंबई, कोल्हापूर, कोकण विभागात एकही कॉपीचे प्रकरण आढळले नाही.