पाचल (नितिश खानविलकर):-राजापूर तालुक्यातील पाचल येथील कै. ज्ञा. म. नारकर वाचनालयाचे माजी कार्यवाह कै. एम. बी. साखळकर यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त शनिवार दि.२२ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता कै. गो. बा. नारकर सभागृह, ग्रामसचिवालय पाचल येथे वाचनालयामार्फत स्मरणिका प्रकाशित करण्यात येणार आहे.
एम. बी. सरांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त नारकर वाचनालया मार्फत प्रकाशित करण्यात येणाऱ्या या स्मरणिकेत त्यांच्या आठवणी, अनुभव, मंदिराची माहिती, कविता, लेख संकलित करण्यात आले आहेत.
नारकर वाचनालय सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल करत असून स्मरणिकेच्या माध्यमातून जाहिराती मिळवून वाचनालयाला आर्थिक सहाय्य मिळावे यासाठी प्रयत्नशील आहे. एम. बी. सरांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी त्यांचे कुटुंबीय, त्यांचे विद्यार्थी, मित्रपरिवार, हितचिंतक यांनी वाचनालयाच्या स्मरणिकेसाठी जाहिरातीच्या रूपाने शक्य ती देणगी देऊन आर्थिक मदत केली आहे.
या कार्यक्रमाला माजी राज्यमंत्री रवींद्र माने सुद्धा उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला सर्वांनी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष श्री किशोर ज्ञानदेव नारकर यांनी केले आहे.